कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : डीजेचा आणि डॉल्बीचा दणदणाट, आणि लेसर किरणांचा चमचमाट! शनिवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती आगमन मिरवणुकीत असा मानवी आरोग्यावर थेट प्रतिकूल परिणाम करणारा घातक माहोल होता. आणि त्याला पोलीस साक्षी होते. त्यांच्यासमोरच ध्वनी नियंत्रण कायद्याला पायाखाली घेऊन तरुणाई बेभान होऊन नाचत होती. मिरवणूक मार्गावर बाल रुग्णांवर उपचार करणारा दवाखाना आहे, प्रसूती गृह आहे, कार्डिया लॉजिकल क्लिनिक आहेत याचे भानही गणेशोत्सव मंडळांना नव्हते. पोलिसांनी 40 पेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात इतीकर्तव्यता मानली.
विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. त्यानंतर महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आपला हात सैल सोडला आहे. परिणामी यंदाचा गणेशोत्सव दणक्यात होणार हे स्वाभाविक होते. त्याची रंगीत तालीम शनिवारी पाहायला मिळाली. लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याने आगमन मिरवणुकीत सर्व नियम धाब्यावर बसवणारा तरुणाई मध्ये सळसळता उत्साह होता. कानाच्या पडद्यावर थेट परिणाम करणारा डीजे आणि डॉल्बीचा दणदणात, कडकडाट होता. डोळ्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या लेसर किरणांचा चमचमाट होता. कानात बोटे घालून, डोळ्यावर हात ठेवून प्रत्येक जण मिरवणुकीच्या गर्दीतून वाट काढत होता. रुग्णवाहिकांना पर्यायी दूरवरच्या रस्त्यावरून रुग्णालय गाठावे लागत होते.
मिरवणूक मार्गावर बाल रुग्णालय आहेत, प्रसूती गृह आहे, त्या ठिकाणी दोन्ही यंत्रणांचा आवाज दाबण्यासाठी कोणतीही खबरदारी प्रशासनाने घेतलेली नव्हती. आगमन मिरवणूक संपल्यानंतर पोलिसांनी कायदा हाती घेणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीत काही मंडळे ध्वनी नियंत्रण कायद्याचा बोजवारा उडवत आहेत हे लक्षात येताच, त्या मंडळाच्या ध्वनीयंत्रणेचा गळा दाबणे आवश्यक होते. प्रसंगी जप्तीची कारवाई करणे आवश्यक होते. पोलीस अशा प्रकारची कारवाई करत आहेत असा संदेश मिरवणुकीत गेला असता तर ध्वनी यंत्रणा नियंत्रणात आली असती. लेसर किरणामुळे अनेकांच्या डोळ्यावर प्रतिकूल परिणाम झाला. एकाच्या डोळ्यातून रक्तस्राव सुरू झाला तर एका पोलिसाच्या डोळ्याला ही इजा झाली. दुसऱ्या दिवशी रविवारी नेत्र चिकित्सा करणाऱ्या क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी वाढलेली होती.
किती जणांचा रक्तदाब वाढला याची कल्पनाच केलेली बरी. वास्तविक गुन्हा घडतो आहे हे लक्षात येताच
तातडीची कारवाई अपेक्षित होती, प्रत्यक्षात मात्र गुन्हा घडण्याच्या प्रतीक्षेत पोलीस होते की काय असा प्रश्न उपस्थित होतोआहे. श्री मूर्तींच्या आगमन मिरवणुकीत जे घडले त्याची पुनरावृत्ती श्री मूर्ती विसर्जन मिरवणुकीत होऊ नये याची किमान दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे.
हेही वाचा:
विकृतीचा कळस! एक महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकले
राज्यात आज मुसळधार! जाणून घ्या तुमच्या शहराला कोणता अलर्ट?
दागिने घडवणाऱ्या प्रसिद्ध कंपनीचा IPO आला, पैसे कमवण्याची लाखमोलाची संधी गमवू नका!