श्री गणेश विसर्जन मिरवणूक कालची आणि आजची……!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची श्री गणेश विसर्जन(Immersion) मिरवणूक 24 तासापेक्षा अधिक काळ चालते. पण सुमारे 60 वर्षांपूर्वी सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्री मूर्तींचे विसर्जन झालेले असायचे. फक्त शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम संस्थेच्या श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक रात्री सुरू होऊन ती बारा वाजेपर्यंत संपायची. तेव्हा मोहरम अमाप उत्साहात साजरा व्हायचा आणि पंजे भेटीच्या मिरवणुका मध्यरात्रीपर्यंत सुरू असायच्या. आता मोहरम काहीसा मागे पडला आहे आणि गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जातो आहे. त्यावर सार्वजनिक मंडळाकडून करोडो रुपये खर्च केले जातात..

साठ वर्षांपूर्वी गणेशोत्सव हा तरुण मंडळांच्या तसेच तालीम संस्थांच्या जागेत साजरा केला जात असे. रस्त्यावर मंडप घातला आहे हे क्वचित ठिकाणी पाहायला मिळायचे. श्री गणेशाच्या मूर्तीनी तेव्हा उंची गाठली नव्हती. अकरा फूट उंचीच्या श्री गणेश मूर्ती अपवादत्मक दिसायच्या. बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेश मूर्तीची उंची सव्वा पाच फूट इतकी असायची. त्यावेळी भजन, किर्तन, संगीत मेळे,पोवाडे असे सांस्कृतिक कार्यक्रम मंडळांच्या कडून आयोजित केले जात असत.

सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने सार्वजनिक मंडळांचे पान सुपारीचे कार्यक्रम आयोजित केले जात असत. यांत्रिक देखावे, सजावटी पाहण्यासाठी तेव्हाही शेवटच्या तीन दिवसात गर्दी व्हायची. ऐतिहासिक आणि पौराणिक देखाव्यावर भर असायचा. यांत्रिक म्हणजे हलके देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची. स्थानिक तरुणांच्या कलेला उत्तेजन देण्याचा यांत्रिक देखाव्यामागे मंडळांचा हेतू असायचा.

पंचगंगा नदीमध्ये श्रीमतींचे विसर्जन(Immersion) केले जायचे. आजच्यासारखा तेव्हा मिरवणूक मार्ग निश्चित नव्हता. शहरातील सर्वच रस्त्यावरून पारंपरिक वाद्यांच्या आवाजात मिरवणुका काढल्या जात असत. एकत्रित मिरवणूक हा प्रकारच तेव्हा नव्हता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत विसर्जन पूर्ण झालेले असायचे. शिवाजी पेठेतील तटाकडे तालमीची श्री मूर्ती सर्वात शेवटी विसर्जित व्हायची. या मंडळाची विसर्जन मिरवणूक मोठी असायची आणि ती पाहण्यासाठी लोकांची रात्री गर्दी व्हायची. ताराबाई रोड, महाद्वार रोड, गुजरी सराफ कट्टा, भाऊसिंगजी रोड, पापाची तिकडे, गंगावेश, शुक्रवार पेठ असा या तालमीच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असायचा.

मिरवणूक मार्गावर दुतर्फा लोकांची गर्दी व्हायची. साधारणतः इसवी सन 1980 पासून सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा व्हायला सुरुवात झाली. तेव्हा बाबुराव धारवाडे यांच्या जनसेवा संघटनेकडून गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. त्यानंतर रस्त्यावर भव्य मंडप घालून गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला. उत्सवाचे स्वरूप बदलू लागले. श्री गणेश मूर्तीची उंची वाढू लागली. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग पोलीस प्रशासनाने निश्चित केला. आणि त्यामुळे श्री विसर्जन मिरवणुकीला एक प्रकारचे भव्यता प्राप्त झाली.

एकदा श्री विसर्जन मिरवणुकीत शेवटचा मानाचा गणपती कोणाचा? यावरून वाद सुरू झाले. तटाकडील तालीम संस्थेने शेवटचा मान आमचा आहे अशी भूमिका घेऊन आमची मिरवणूक सर्वात शेवटी राहील असे पोलीस प्रशासनाला सांगितले. हा वाद वाढला आणि मग पोलिसांनी बळाचा वापर केला. मिरवणूक मार्गावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या श्रीमूर्ती जागेवर ठेवून एक प्रकारचा पोलीस प्रशासनाचा निषेध केला. शेवटी पोलिसांनी ही मिरवणूकच तब्येत घेतली आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्तींचे विसर्जन केले.

त्यानंतर मात्र “शेवटच्या माना”वरून होणारा वाद थांबला. तुकाराम माळी तालमी ची श्री गणेश मूर्ती ही विसर्जनासाठी मिरवणुकीत सर्वप्रथम असते. बजाव माजगावकर तालीम संस्थेने शाडू पासून अकरा फूट उंचीची श्री गणेश मूर्ती तयार केली होती आणि ही मूर्ती पंचगंगेत विसर्जित करताना दोन कार्यकर्ते पाण्यात बुडाले होते.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्यांचा वापर प्रामुख्याने केला जायचा. त्यानंतर झांज पथक हा प्रकार पहिल्यांदा दिलबहार तालमीने मिरवणुकीत आणला. आणि मग नंतरच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत अशा प्रकारच्या झांज पथकांचा दणदणाट सुरू झाला. आता झांज पथकाची जागा डॉल्बी, डीजे या आरोग्यास घातक असलेल्या ध्वनी यंत्रणेचा वापर सुरू झाला. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून मिरवणुकीत लेसर किरणे आली. गेल्या काही वर्षांपासून सकाळी आठ वाजता सुरू झालेली श्री गणेश विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशीच्या दुपारी बारा वाजेपर्यंत चालली आहे
अशी दीर्घकाळ निर्मितीची परंपरा सुरू झाली. ते आजही अखंडित आहे.

हेही वाचा:

ढोलवर बसून डान्स करायला गेला अन्…; असे काही झाले की…Video

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

भाजप नेत्यानं धमकी दिली ‘वर्दी उतरवा देंगे…’, जिगरबाज ASI नं स्वत:च वर्दी काढली अन्…