इचलकरंजी, ३० सप्टेंबर: पंचगंगा नदीच्या प्रदूषण समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. इचलकरंजी शहर आणि परिसरातील वाढत्या औद्योगिक आणि नागरी सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तीन कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स (सीईटीपी) उभारण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ५२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामुळे पंचगंगा नदी शंभर टक्के प्रदूषणमुक्त होईल अशी अपेक्षा आहे.
या सीईटीपी प्लांट्समुळे विशेषतः कापड उद्योगांमधून बाहेर पडणारे रासायनिक आणि इतर घातक पदार्थ यांचे शुद्धीकरण करण्यात येईल. प्लांट्सची संपूर्ण प्रक्रिया प्रोसेसिंग सायजिंग आणि ड्रेनेज सिस्टिमवर आधारित आहे, ज्यामुळे संपूर्ण औद्योगिक आणि नागरी सांडपाण्याचे शुद्धीकरण होणार आहे. यामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी होईल आणि शुद्ध पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच स्थानिक खासदार धैर्यशील माने आणि जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला आहे. त्यांनी विविध सरकारी विभागांशी सातत्याने संवाद साधत, या प्रकल्पासाठी निधी आणि मंजुरी मिळवली आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो. या प्रकल्पामुळे नदीच्या पाण्याचे शुद्धीकरण होईल, ज्यामुळे पंचगंगेतील जलस्रोतांची गुणवत्ता सुधारेल आणि प्रदूषणमुक्तीची प्रक्रिया जलदगतीने होईल. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास, नदीतील जलजीवन आणि स्थानिक पर्यावरणाला मोठा फायदा होईल. स्थानिक लोकांच्या आरोग्यावरही याचा सकारात्मक परिणाम होईल.