इचलकरंजीतील पाण्यासाठीचे आंदोलन अधिक ताकदीने उभा करू – शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले

इचलकरंजी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असलेल्या नागरिकांच्या आंदोलनावर जर प्रशासनाकडून किंवा राजकीय नेत्यांकडून दडपशाही करण्यात आली, तर हे आंदोलन अधिक जोमाने उभा करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिला.

गेल्या आठ दिवसांपासून इचलकरंजी शहरातील नागरिक आणि विविध संघटनांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ पाण्याच्या समस्येवर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन शांततेत आणि लोकशाही पद्धतीने सुरू असतानाही, काही राजकीय नेत्यांनी आपल्या खुर्चीला फटका बसू नये म्हणून प्रशासनाच्या मदतीने हे आंदोलन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप संजय चौगुले यांनी केला.

आज 1 ऑक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मँचेस्टर आघाडी इचलकरंजी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी चौगुले यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या सुळकुड पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

आंदोलनात शिवसेनेचे इचलकरंजी शहरप्रमुख सयाजी चव्हाण, माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे मामा, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, राजूदादा आलासे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, काँग्रेसचे राहुल खंजिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास जांभळे, युवासेना प्रमुख सागर जाधव, शहर समन्वयक रतन वाझे, आणि इतर स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी इचलकरंजीतील नागरिकांच्या पाण्याच्या हक्कासाठी एकजूट दाखवली.

शहरातील नागरिकांच्या पाण्यासाठीची ही लढाई राजकीय दबावाने संपुष्टात आणली जाणार नाही, असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.