कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : देशातील काही राज्यात विशेषतः महाराष्ट्रात आरक्षणाच्या(reservation) प्रश्नावरून मराठा समाज विरुद्ध ओबीसी संघटना, धनगर विरुद्ध आदिवासी असा जात संघर्ष उभा राहिला आहे. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे हा संघर्ष टोकदार वळणावर आता येणार आहे.
महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार हे जात फॅक्टर ठरवणार आहे. अशा वेळी आरक्षण(reservation) विषयावर कोणाही राजकीय नेत्याला ठामपणे बोलण्याचे धाडस होताना दिसत नाही. इंडिया आघाडीचे नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मात्र आरक्षण टक्केवारी मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षणाचे गणित सोपे होणार नाही असा सुस्पष्ट सामाजिक हिशोब सांगितला आहे. 122 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानातील मागास घटकांना आरक्षण देऊन सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ लावली. त्यांच्याच कोल्हापुरात राहुल गांधी यांनी आरक्षणावर घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे.
कसबा बावडा परिसरातील भगवा चौकात छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी तसेच संविधान सन्मान संमेलनासाठी राहुल गांधी हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. संविधान सन्मान संमेलनात बोलताना त्यांनी आरक्षण या विषयावर आपले ठाम मत मांडले. सध्या देशात आरक्षण मर्यादा 50% आहे. ती वाढवल्याशिवाय मागणी करणाऱ्या इतरांना आरक्षण देता येणार नाही. काँग्रेस अर्थात इंडिया आघाडी सत्तेत आली तर आरक्षण मर्यादा वाढवण्याचा निर्णय निश्चितपणे घेतला जाईल असे सांगितले आहे.
जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण तो एक प्रकारचा एक्स-रे आहे. त्यातूनच प्रत्येक जातीची सामाजिक आणि आर्थिक तसेच शैक्षणिक माहिती उपलब्ध होणार आहे. या एक्स-रे तूनच देश कुठे आहे हे समजणार आहे. ही त्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आशिष स्पष्ट भूमिका मांडतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष नेत्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महायुती सरकारने सोडवला पाहिजे अशी भूमिका यासंदर्भात सातत्याने घेतलेली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही यापेक्षा वेगळी भूमिका घेतलेली दिसत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे आरक्षण मर्यादा 75 टक्के पर्यंत नेण्यात आली पाहिजे अशी भूमिका मांडू लागले आहेत.
आरक्षण(reservation) मर्यादा वाढवण्याची पहिली मागणी राहुल गांधी यांनी केल्यानंतर शरद पवार यांनी तीच भूमिका घेतलेली दिसते. हेच शरद पवार म्हणत होते की राज्य शासनाने यासंदर्भात निर्णय घेतला पाहिजे. राज्य शासन जो निर्णय घेईल त्याला आमचे समर्थन असेल. याचा अर्थ ते सुद्धा स्पष्ट भूमिका घ्यायला कचरत होते. स्पष्ट भूमिका घेतली तर मतदार नाराज होतील. असा विचार करून ते आरक्षणावर बोलत होते.
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रसंगी केलेले भाषण आणि नंतर संविधान सन्मान संमेलनात व्यक्त केलेली मते म्हणजे त्यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरातून केलेला आहे असे मानले जाते.
राहुल गांधी यांनी कोल्हापुरात आल्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या मुसळगाव येथील घरामध्ये दीड तास घालवला. या कार्यकर्ते घरात त्यांनी स्वतः जेवण बनवले. कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयासमवेत त्यांनी भोजन केले. त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे मात्र त्यांनी आपल्या कोल्हापूरच्या दौऱ्यात दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले पाहिजे होते. कदाचित त्यांना पी एन पाटील माहित नसतील. पण स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना माहिती करून देणे आवश्यक होते.
पी एन पाटील यांनी काँग्रेस ही कोल्हापूर जिल्ह्यात रुजवली. कोल्हापुरात मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला आहे. राजीव गांधी यांच्या जन्मदिनी पी एन पाटील यांच्या वतीने दरवर्षी सद्भावना दौड आयोजित केली जात होती.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच त्यांचे निधन झाले. कोल्हापुरातून काँग्रेसचा खासदार निवडून देण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा होता. या एकूण पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पी एन पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले असते तर ते उचित ठरले असते. कोल्हापुरातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राहुल गांधी यांना पी एन पाटील यांच्या विषयी माहिती सांगितली असती तर ते नक्कीच त्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेले असते. राहुल गांधी यांचा दौरा यशस्वी झाला पण त्यांच्याकडून काहीतरी राहून गेले हे मात्र निश्चित.
हेही वाचा:
‘स्त्री-२’च्या कोरियोग्राफरचा राष्ट्रीय पुरस्कार सरकारने घेतला परत, बलात्काराच्या आरोपात…
कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
कोचिंगमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकांवर चप्पलांचा वर्षाव, व्हिडिओ व्हायरल