कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ओबीसी(reservation) संघटना म्हणतात आमच्यात मराठा नकोत, आणि आदिवासी म्हणतात आमच्या पंगतीत धनगर बसता कामा नयेत. एकूणच सावळो गोंधळाची परिस्थिती सध्या निर्माण झालेली असताना महायुती सरकारने गोंधळात गोंधळ घातला आहे. हा गोंधळ थांबवण्यासाठी या नवरात्र उत्सवात नऊ दुर्गांना साखरे घालणारा गोंधळच घातला पाहिजे. सर्वांना सुबुद्धी दे या विचाराचा जागरही झाला पाहिजे.
या राज्यातील सर्व धनगरांचा उल्लेख “धनगड” असा करावा अशा प्रकारचे राज्य शासनाने शुद्धिपत्रक काढले आणि त्याला विरोध होताच तातडीने ते मागे घेण्याच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. हा शुद्धिपत्रकाचा गोंधळ कोणी घातला? त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी धनगर समाजाच्या नेत्यांनी आता केली आहे. एकूणच आरक्षण प्रश्नावर समाधान कोणते शोधायचे याचाच वैचारिक गोंधळ सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.
धनगर आणि धनगड हा शब्द छल इंग्रजी स्पेलिंग वरून झाला आहे. स्पेलिंग वरून धनगर चा अपभ्रंश धनगर असा झाला आहे. त्यामुळे आरक्षणाला(reservation) पात्र कोण? धनगर की धनगड ? हा प्रश्न अनेक वर्षापासूनचा आहे आणि त्याचे नेमके उत्तर आजही मिळताना दिसत नाही. शेजारच्या कर्नाटकात धनगड समाजाला आरक्षण अनुसूचित जातीमध्ये देण्यात आले आहे मात्र महाराष्ट्रात”धनगर”समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यात आले आहे. आणि आता या समाजाने आम्हाला ओबीसीतून एसटीमध्ये अर्थात अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी केली आहे.
धनगर समाज आक्रमक झाल्यानंतर आणि या समाजाच्या नेत्यांनी सरकारला राजकीय खिंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातील आदिवासी समाज आणि या समाजाचे लोकप्रतिनिधी अतिशय आक्रमक झालेले दिसतात. आदिवासी समाजाचे आमदार नरहरी झिरवळ हे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष होते.
त्यांनी आदिवासी समाजाच्या इतर आमदारांना सोबत घेऊन मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आणि महायुती सरकारवर दबाव टाकण्यासाठी या आमदारांनी मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर उड्या मारण्याचे धाडसी आंदोलन केले. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून एका शेतकऱ्याने त्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खाली उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी संरक्षक जाळ्या लावण्यात आल्या. आता या जाळ्यांवर उड्या मारण्याचे नवे आंदोलन आदिवासी समाजाने शोधून काढले आहे. आता मंत्रालयात अशाच प्रकारची आंदोलने झाली तर त्यात नवल वाटू नये.
एकीकडे धनगर समाज आणि दुसरीकडे आदिवासी समाज अशा कात्रीत राज्य शासन सध्या सापडले आहे.
त्यातून सुवर्ण मध्य काढण्यासाठी शासनाने धनगर ऐवजी धनगड असे वाचावे अशा आशयाचे शुद्धी पत्रक काढले. धनगड म्हणून सहा जणांना तशी प्रमाणपत्र ही वितरित करण्यात आली. मात्र धनगड समाज महाराष्ट्रात नाही. त्यामुळे शासनाने काढलेले शुद्धिपत्रक मागे घ्यावे आणि देण्यात आलेली प्रमाणपत्रे रद्दबातल ठरवावीत अशी मागणी धनगर नेत्यांनी केल्यानंतर शासनाने शुद्धिपत्रक मागे घेतले आहे.
धनगर समाजाला इतर काही सवलती राज्य शासनाने जाहीर केल्या असल्या तरी त्यांची मूळ मागणी अद्यापही मान्य झालेली नाही त्यामुळे हा समाज विधानसभा निवडणूक काळात आक्रमक होईल असे दिसते. आदिवासी समाजासाठी सुद्धा काही सवलती राज्य शासनाने जाहीर केल्या आहेत. ही खरी तर तात्पुरती मलमपट्टी आहे. मूळ दुखणे आहे त्याच स्थितीत आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्रातील 15 जातींना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठा समाज संतापला आहे. या 15 जातींना ओबीसीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला छगन भुजबळ यांनी विरोध केलेला नाही याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर राज्य शासनाला त्यांनी आक्रमक शब्दात जाब विचारला आहे. इतर 15 जातींना ओबीसीत घातले जात असेल तर मराठा समाजाने काय घोडे मारले आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एकूणच महाराष्ट्रात आरक्षण(reservation) या विषयावरून गोंधळात गोंधळ सुरू आहे. या गोंधळाच्या चक्रव्यूहात राज्यकर्ते सापडले आहेत. आणि येत्या निवडणुकीत त्यांचा अभिमन्यू व्हावा असे राज्यातील विरोधी पक्षांना वाटते आहे. वास्तविक मराठा समाज आरक्षण प्रश्नात सर्वच राजकीय पक्षांचा संबंध आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला या प्रश्नातून आपले अंग काढून घेता येणार नाही. विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे अशी आग्रही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. पण आता त्यांनाही पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याशिवाय अन्य पर्याय दिसत नाही. उपोषण किंवा प्रत्यक्ष निवडणुकीत उतरून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणे हा सुद्धा त्यांच्यासमोर एक पर्याय आहे.
हेही वाचा:
केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये शिक्षणासंबंधी महत्वाचा करार!
पूजेमध्ये आंब्याचे, विड्याचे पान; दसऱ्याला आपट्याच्या पानाला का मान?
मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून बालाजी मंदिर हटवले