राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच अजित पवारांच्या(politics) राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेऊन विधानसभा निवडणुकांमध्ये उतरण्यासाठी नेतेमंडळींची लगबग पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्याच्या फलटण मतदारसंघात ठरल्याप्रमाणे 14 ऑक्टोबर रोजी अजित पवार(politics) गटातील आमदार राजराजे नाईक निबांळकर यांचे बंधू संजीव निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी अजित पवारांना धक्का देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, आज सोलापूर जिल्ह्यातही अजित पवारांना धक्का देण्यात आला असून अजित पवार यांच्यासोबत असलेल्या दीपक साळुंके यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील सर्वच पदांचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणाच केली आहे. दीपक साळुंखे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती.
महायुतीमध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचा, त्या पक्षाला ती जागा देण्याचा निर्णय झाल्यामुळे, सोलापूर जिल्ह्यातील सांगोल विधानसभेची जागा विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासाठीच शिवसेना शिंदे गटाला सुटणार आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातून इच्छुक असलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शड्डू ठोकलाय.
गेल्या निवडणुकीत अतिशय निसटता विजय मिळवलेले शहाजी बापूंना आता यावेळी आपण केलेल्या विकासाच्या जोरावर निवडून यायचे असून त्यांचे पारंपारिक विरोधक असणारे शेतकरी कामगार पक्ष याच्याशी दोन हात करताना त्यांना एक एक मताची आवश्यकता भासत आहे. सध्या शेतकरी कामगार पक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख हे दोन भाऊ उमेदवारीसाठी झगडत असून याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न शहाजीबापू करीत आहेत.
मात्र, शहाजी बापूंना गेल्या वेळी निवडून आणण्यात सिंहाचा वाटा असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनीही आता विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याने शहाजीबापू प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करताना दिसत आहेत.
दीपक साळुंखे यांची मोठी ताकद असून सध्या त्यांच्याकडून ठाकरे गटाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. सांगोल्यात महाविकास आघाडीचे तिकीट ठाकरे गटाला मिळाल्यास दीपक साळुंखे येथील उमेदवार असणार आहेत आणि असे झाल्यास या तिरंगी लढतीत कशा रीतीने सामोरे जायचे याचा प्रयत्न शहाजीबापू करीत आहेत.
त्यातच, दीपक साळुंखे यांनी आता विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, दीपक साळुंखे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुतारी हाती घेतात की अपक्ष मैदानात उतरतात हे पाहावे लागेल.
हेही वाचा:
चालता चलता महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी अन् … Viral Video
‘या स्टेप्स फॉलो करा अन् घरबसल्या तपासा मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 निकाल