सायबर क्राईम चे आव्हान

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : भारतीय फौजदारी कायदा अस्तित्वात येऊन आज सुमारे 124 वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे. जेव्हा हा कायदा आणला गेला तेव्हा सायबर क्राईम(cybercrime) हा प्रकारच नव्हता. त्यामुळे त्या संदर्भातील गुन्ह्याचा तपास करण्याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. 21व्या शतकात पदार्पण केले तेव्हा माहिती आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला होता. मोबाईल क्रांती झाली होती. हा तांत्रिक आणि वैज्ञानिक बदल हा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अतिशय योग्य मानला गेला.

तथापि चांगल्या बरोबर काही वाईट गोष्टीही येत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा जसा विकासासाठी उपयोग केला जातो आहे तसाच तो विध्वंसासाठीही केला जातो आहे. सायबर क्राईम(cybercrime) हा त्यातूनच नुसता पुढेच आलेला नाही, तर तो अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने हुशार गुन्हेगारांच्याकडून केला जातो आहे. आणि हा क्राईम नियंत्रणात आणण्यासाठी तपास यंत्रणांच्या कडून प्रभावीपणे उपाययोजना केल्या जात नाहीत. परिणामी हे गुन्हे देशभर वाढलेले पाहायला मिळतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या “मन की बात” कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना वाढत्या सायबर क्राईम बद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे गुन्हे टाळण्यासाठी सर्वसामान्य जनतेनेच खबरदारी पुरेशा प्रमाणात घेतली पाहिजे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. सायबर क्राईम करणाऱ्यांच्या विरुद्ध तपास यंत्रणांनी कठोर कारवाई केली पाहिजे, तरच अशा प्रकारचा क्राईम नियंत्रणात आणता येऊ शकतो असे मोदी यांनी म्हटले आहे.

21व्या शतकात सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे याची कल्पना संबंधितांना आलेली नव्हती. त्यामुळेच अशा प्रकारचा क्राईम घडला तर त्याचा तपास कसा करायचा याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मिळालेले आहे असे म्हणता येणार नाही.

माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 आणि कलम 67 हा अस्तित्वात आल्यानंतर तपास यंत्रणा सजग झाल्या. पण या नवीन कायद्याखाली नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या संदर्भात पोलीस प्रशिक्षण केंद्रामधून तशा प्रकारचा अभ्यासक्रम शिकवला गेला पाहिजे, पण अशा प्रकारचा अभ्यासक्रम पोलिसांना त्यांच्या प्रशिक्षण काळात शिकवला जातो काय हा प्रश्न आहे.

सायबर क्राईम(cybercrime) करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलीस प्रशासनाला अनेक प्रकारच्या अडचणी येतात. सायबर क्राईम चा तपास करण्यासाठी जिल्हा पातळीवरील पोलीस प्रशासनात पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. मुळातच पोलीस प्रशासनातील सर्वच कर्मचारी आणि अधिकारी हे 100% ई साक्षर आहेत अशी वस्तुस्थिती नाही.ई साक्षरताच नसेल तर तपास करणार कसा?

सध्या पोलीस प्रशासनात आर्थिक गुन्हे शाखा नव्याने सुरू करण्यात आली असून त्यांच्याकडेच सायबर क्राईम तपास सोपवला जातो. या शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. सायबर क्राईम ची व्यापकता मोठी आहे. दिल्लीत बसून कोल्हापूरच्या माणसाला फसवता येते किंवा त्याचा बँक बॅलन्स एका क्षणात हडप केला जातो. अशावेळी तपासासाठी दिल्लीत जावे लागते पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात तपास अधिकाऱ्यांना फंड उपलब्ध करून दिला जात नाही. फिर्यादी कोल्हापुरात आणि आरोपी दुसऱ्या कुठल्यातरी राज्यात. अशी परिस्थिती असेल तर संबंधित तपास अधिकाऱ्यांनी करायचे काय?
‌‌कोल्हापूरसह देशभर सायबर क्राईम वाढलेला आहे आणि भविष्यात तो वाढतच जाणार आहे. त्यामुळे कॉन्स्टेबल पासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तंत्रशुद्ध आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशा गुन्ह्यात थर्ड मेथड डिग्री चालत नाही.

मुळातच अशा थर्ड डिग्रीचा वापर करण्यासाठी गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असणे आवश्यक असते. सध्या तरी अशा गुन्ह्यातील संशयित आरोपींना पकडण्याची टक्केवारी किमान पातळीवरची आहे. सायबर क्राईम गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यासाठी, पुरेशा प्रमाणात पोलीस मनुष्यबळ आणि फंड उपलब्ध करून दिला गेला पाहिजे.

माहिती व तंत्रज्ञान कायदा 66 आणि 67 हा प्रामुख्याने अश्लील साहित्य, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याच्या संदर्भातील आहे. त्याचा तपास कसा करायचा हे बऱ्याचश्या पोलीस अधिकाऱ्यांना समजत नाही. त्यामुळे या कलमाखाली दाखल केलेल्या गुन्ह्यात संशयित आरोपींना शिक्षा झालेली आहे असे क्वचितच घडले आहे. सायबर क्राईम हा प्रामुख्याने आर्थिक गुन्ह्याशी संबंधित आहे. बघता बघता दुसऱ्याच्या खात्यावरील पैसे ऑनलाईन लंपास करण्याचा हा फंडा आहे. अर्थात त्याचा तपासही क्लिष्ट आहे. मुळात सायबर क्रिमिनल्स हे सहसा पोलिसांच्या हाती लागत नाहीत. त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या ऑनलाईन संपर्काला प्रतिसाद द्यायचा नाही हाच एकमेव मार्ग सायबर क्राईम रोखण्यासाठी उपलब्ध आहे.

हेही वाचा :

‘अभिनेत्री काजोलचं विमान कोसळलं’, आईला फोनवर मिळाली मुलीच्या निधनाची बातमी

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

आत्महत्येची भाषा करणारे आमदार कालपासून बेपत्ता, मुख्यमंत्र्यांचा तातडीने फोन