राज ठाकरेंच्या पदरी निराशाच?मनसे’ला किती जागा मिळणार पाहिलं

महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेसाठी (Assembly)बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. महाराष्ट्रामध्ये एकूण 65.11 टक्के मतदान झालं आहे. या मतदानानंतर एक्झिट पोलची आकेडवारी समोर आली आहे. मतदारांच्या मनात काय आहे? राज्यामध्ये कोणाचं सरकार येणार यासंदर्भातील प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी की महायुती कोणाच्या बाजूने जनतेचा कौल असेल याबद्दल वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात आले असले तरी प्राथमिक कल हा महायुतीच्या बाजूने असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान यंदा अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांच्या पदरी निराशाच पडणार असल्याचं एक्झिट पोल सूचित करत आहेत. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीमधील प्रत्येकी तीन घटक पक्षांबरोबरच फार जोमाने निवडणुकीत उतरलेल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भातील एक्झिट पोलची आकडेवारीही समोर आली आहे.

राज ठाकरेंनी लोकसभा (Assembly)निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. त्यांनी यासाठी काही ठिकाणी प्रचारसभाही घेतल्या होत्या. मात्र विधानसभेला राज ठाकरेंनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढवली. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमधूनच 250 ते 265 उमेदवार देण्यासंदर्भात विधान केलं होतं. मध्यंतरी मनसे आणि भाजपाची जवळीक वाढल्याने राज ठाकरेंची महायुतीमध्ये एन्ट्री होत मनसेच्या रुपात महायुतीत चौथा पक्ष येणार की काय अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र शेवटपर्यंत यावर कोणताही ठाम निर्णय न झाल्याने टप्प्याटप्प्यात राज ठाकरेंनी 138 उमेदवारांची घोषणा केली. राज ठाकरेंचा पक्ष अर्ध्याहून कमी जागांवर लढला.

राज ठाकरे पूर्ण तयारीने प्रचारात उतरल्याचं दिसून आलं. कधी दिवसाला दोन तर कधी अगदी तीन ते चार सभाही राज ठाकरेंनी घेतल्याचं दिसून आलं. रोड-शो, शाखांना मतदानाच्या आदल्यादिवशी अचानक दिलेल्या भेटी यासारख्यामुळे मनसेला वातावरण निर्मितीत यश आलं. मात्र याचं मतांमध्ये रुपांतर होणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. आता एक्झिट पोलमधून मनसेला किती जागा मिळू शकतात याबद्दलची संभाव्य आकडेवारी समोर आली असून प्राथमिक अंदाजांनुसार राज ठाकरेंच्या मनसेला यंदाही फारसं यश मिळणार नाही अशी चिन्हं दिसत आहेत.

एका मुलाखतीत राज ठाकरेंनी, ‘मनसेच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन होईल,’ असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात एक्झिट पोलचे आकडे काहीतरी वेगळं सूचित करत आहेत. राज ठाकरेंना यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये झंझावती प्रचारानंतरही फार यश मिळणार नाही अशीच शक्यता जवळपास सगळ्याच प्रमुख एक्झिट पोल्सने व्यक्त केली आहे. ‘दैनिक भास्कर’च्या पोलनुसार मनसेला केवळ 2 ते 4 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. ‘इलेक्ट्रोल एज’च्या एक्झिट पोलनुसार मनसे, वंचित, एमआयएम आणि अपक्ष या सर्वांना मिळून केवळ 20 जाग मिळतील असा अंदाज आहे. ‘चाणक्य’च्या एक्झिट पोलनुसार मनसे आणि वंचितच्या उमेदवारांना एकत्रितपणे केवळ 6 ते 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. अर्थात एक्झिट पोल हा केवळ अंदाज असला तरी सामान्यपणे यामध्ये सांगितलेल्या जागांच्या आसपासच निकाल लागतात. त्यामुळे मनसेचं नेमकं काय होणार? यंदा राज ठाकरेंचे किती आमदार विधानसभेत जाणार हे प्रत्यक्षात निकालाच्या दिवशी म्हणजे 23 तारखेलाच स्पष्ट होईल.

हेही वाचा :

भयंकर! हेअर ड्रायरच्या स्फोटात शहीद जवानाच्या पत्नीनं गमावले दोन्ही हात

लोकसभेची पुनरावृत्ती? अजित पवारांना बसणार मोठा धक्का?

आजच्या महाराष्ट्राचे उद्याचे राजकीय चित्र काय असेल?