उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, सातत्यानं तिथून वाहणाऱ्या शीतलहरींनी महाराष्ट्रापर्यंत तापमानात (temperature)घट आणल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मुक्काम ठोकून असणाऱ्या थंडीनं आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत हातपाय पसरल्यामुळं अर्ध्याहून अधिक राज्य गारठल्याचं पाहायला मिळत आहे. निफाड आणि धुळ्यात राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं तापमानाचा 10.5 अंशांवर पोहोचलेला आकडा सर्वांचीच दातखिळी बसवताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार जवळपास राज्यातील 17 जिल्ह्यांमधील तापमान (temperature)15 अंशांवरपोहोचलं असून, पुढील 48 तासांमध्ये ही घट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील घाटमाध्यावरील क्षेत्रामध्येही थंडीचा कडाका वाढणार असून, पहाटेच्या वेळी इथं दाट धुक्याच्या चादरीमुळं दृश्यमानतेवरही परिणाम होताना दिसणार आहे.
प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढचे पाच दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज आहे. मुंबईसुद्धा इथं अपवाद ठरणार नसून, शहरातील तापमानाचा आकडा 18 अंशांवर आल्यानं मुंबईतसुद्धा हिवाळ्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे.
एकिकडे राज्याचा बहुतांश भाग शीतलहरींच्या प्रभावाखाली आलेला असतानाच दुसरीकडे मात्र रत्नागिरी आणि कोकणातील काही भागांमध्ये मात्र अद्याप समाधानकारक थंडीची नोंद करण्यात आलेली नाही. राज्यात 30 नोव्हेंबरनंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 23 नोव्हेंबरनंतर वाऱ्याची दिशा बदलणार असल्यामुळं आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळं पुढील तीन ते 4 दिवस दक्षिण महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्राच्या काही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा :
निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांनी नेमका कोणाचा डाव उधळला
तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने का भोगायची? मोदींना ठाकरेंच्या सेनेचा सवाल
मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुनने ‘त्या’ खास व्यक्तीसाठी काढला टॅटू