कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : निवडणूक लोकसभेची(political news) असो किंवा विधानसभेची. निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी, त्यांच्या नेत्यांनी असे का घडले याचे आत्मचिंतन केलेच पाहिजे. त्याचबरोबर निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी ही आपण मैदान कसे मारले? आपण केलेल्या कामाची मतदारांच्याकडून पोहोच पावती मिळाली आहे काय?
आपली निवडणूक रणनीती यशस्वी झाली आहे काय? किंवा आणखी कोणत्या घटकांनी आपला विजयाचा मार्ग सुकर केला याचे आत्मचिंतन केले पाहिजे. आणि अशा प्रकारच्या आत्मचिंतनातून बाहेर पडल्यानंतर मतदार संघाबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वच दहा आमदारांनी सामूहिक प्रयत्न करायला हवेत याचा निर्णय घेतला पाहिजे. राजकीय शत्रुत्व निवडणूक काळातच दाखवावे याचे भान जर नवनिर्वाचित आमदारांना आले तरी विकासाचे प्रवाह जिल्हाभर सुरू होतील.
कोल्हापूर(political news) शहरासह जिल्ह्याचे विकासाशी निगडित असलेले अनेक प्रश्न उत्तराच्या शोधात आहेत. पूर्वी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी हातात निषेधाचे किंवा मागण्यांचे फलक गळ्यात अडकवून मंत्रालयाच्या समोर विधी मंडळासमोर पायऱ्यांवर बसून, उभा राहून आंदोलन करत असत. आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्याच 10 उमेदवारांनी विजयाचे मैदान मारले असल्यामुळे मुंबईत मंत्रालयाच्या आवारात आंदोलन आता होणार नाही. आणि म्हणूनच नवनिर्वाचित आमदारांची जबाबदारी अधिक तीव्रतेने वाढलेली आहे.
कोल्हापूरच्या राजकारणाचं नको असलेलं एक वैशिष्ट्य आहे. आणि ते म्हणजे वर्षानुवर्षे राजकीय शत्रुत्वाची परंपरा अखंडित ठेवणे हे आहे. सतेज पाटील विरुद्ध आधी दिग्विजय खानविलकर, नंतर महाडिक, हसन मुश्रीफ विरुद्ध आधी सदाशिवराव मंडलिक आणि आता समरजित सिंह घाटगे, पी एन पाटील विरुद्ध संपत बापू आणि आता चंद्रदीप नरके विरुद्ध राहुल पी एन पाटील, विनय कोरे विरुद्ध आधी यशवंत एकनाथ आणि आता सरूडकर पाटील, चंदगड मध्ये पूर्वी व्हीके चव्हाण विरुद्ध नरसिंग गुरुनाथ हे मामा भाचे, राधानगरी भुदरगड मध्ये के पी विरुद्ध आत्ता अबिटकर आणि पूर्वी जाधव, देसाई अशी उदाहरणे देता येतील.
यातील बऱ्याच आजी-माजी लोकप्रतिनिधींनी पारंपारिक राजकीय(political news) शत्रुत्व हेच आपले बलस्थान मानले आहे. आपले गट जिवंत ठेवण्यासाठी हे करावे लागते असा त्यांचा युक्तिवाद असतो. या मंडळींनी अशा पद्धतीने आपली राजकीय ताकद खर्च करण्यात धन्यता मानल्याने विकास कामांसाठी भांडण्याची शक्ती ते गमावून बसलेले दिसतात.
आजी, माजी लोकप्रतिनिधींनी त्यांचे विकास कामाचे कार्यक्षेत्र हा त्यांचा मतदारसंघ आहे असे ठरवले असले तरी तिथे विकास झाला आहे आणि तो परिपूर्ण विकास आहे असे कोणीही म्हणणार नाही. जिल्ह्याचा विकास यावरच सर्वांनी लक्ष केंद्रित केले तर त्यांच्या मतदारसंघाचाही आपोआपच विकास आणि फायदा होणार आहे. कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाले पाहिजे, पोलीस आयुक्तालय झाले पाहिजे, कोल्हापूर शहराची हद्द वाढ झाली पाहिजे, अंबाबाई मंदिर विकास आराखडा कागदावरून खाली उतरला पाहिजे.
पंचगंगा नदी शुद्ध झाली पाहिजे, राजश्री शाहू महाराजांनी संस्थानातील दुष्काळावर मात करण्यासाठी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी बांधलेल्या 60 तलावांना प्रदूषण मुक्त केले पाहिजे, वाडी रत्नागिरी ज्योतिबा मंदिर, नरसिंह वाडी तीर्थस्थान परिसर, शिरूर तालुक्यातील कोपेश्वर मंदिर परिसर येथे प्रथम श्रेणीतील धार्मिक पर्यटन समृद्धी झाली पाहिजे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्ती पीठ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यास तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली पाहिजे, राजर्षी शाहू महाराजांचा राष्ट्रीय पातळीवरील भव्य स्मारक लाल फितीतून बाहेर पडलं पाहिजे, हे सर्व प्रश्न आणि प्रकल्प विकासाशी निगडित आहेत आणि ते सोडवण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींना सामूहिक राजकीय शहाणपण येत नाही हे वास्तव आहे. नळावर किंवा पाणवठ्यावर पाण्यासाठी भांडणाऱ्या बायका सुद्धा नंतर हळदीकुंकू कार्यक्रमाला एकत्र येतात पण इथले राजकारणी राजकीय शत्रुत्व आजही कुरवाळत बसलेले दिसतात.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत(political news) विजयाची गुढी उभारणाऱ्यांनी इतके सगळे प्रश्न उत्तराच्या शोधात कितीतरी वर्षांपासून असताना आपण कसे विजयी झालो याचे आत्मचिंतन करावे. एक है तो सेफ है, लाडकी बहीण योजना शिवाय व्यक्तिगत पातळीवर स्वीकारलेला”गांधी”वाद जो कधी मरत नाही यामुळे आपण विजयी झालो आहोत हे त्यांनी विसरू नये आणि म्हणूनच विकास कामावर पुढची निवडणूक जिंकण्यासाठी आत्तापासूनच कामास लागले पाहिजे.
हेही वाचा :
Netflix चा आणखी एक मोठा धमाका…
क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंग, दक्षिण आफ्रिकेच्या 3 क्रिकेटपटूंना अटक!
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील ‘या’ 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप