कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस(Congress) पक्षाला जो दारुण पराभव स्वीकारावा लागला त्यास महाराष्ट्र काँग्रेसचे नेते जबाबदार असल्याचा ठपका मल्लिकार्जुन खरगे यांनी ठेवला आहे. नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील पराभवाचे मंथन झाले. हा पराभव नेत्यांच्या अंतर्गत दुहिमुळे झाला असल्याचा निष्कर्ष काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी काढला आहे. त्यामुळे दारुण पराभवास ईव्हीएम मशीन कारणीभूत नसल्याचे राष्ट्रीय काँग्रेसने अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे. सध्या महाविकास आघाडी कडून ईव्हीएम मशीन मध्ये गडबड करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा फार मोठा झटका बसला आहे. या आघाडीतील घटक पक्षांचे जे उमेदवार निवडून आले त्या सर्वांची एकत्रित संख्या पन्नासही झालेली नाही. त्यामुळेच आघाडीतील घटक पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या पराभवाला ईव्हीएम मशीन जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारी समितीची नवी दिल्ली येथे बैठक झाली. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नव्हता. ते एकमेकांवर कुरघोडी करत बसले. आपापसात भांडत राहिले.
त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या(Congress) नेतृत्वाचा एकत्रित प्रभाव सर्वसामान्य मतदारांवर पडला नाही. त्यामुळेच मोठा पराभव झाला असे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व इतर राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. याचा अर्थच असा आहे की, ईव्हीएम मशीन या पराभवाला जबाबदार नाही असे काँग्रेसने अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचे खापर ईव्हीएम मशीन वर फोडले आहे तर राष्ट्रीय काँग्रेसने या पराभवाचे खापर महाराष्ट्रातील नेत्यांवर फोडले आहे हे इथे लक्षात घेतले पाहिजे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर, मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने तिसऱ्यांदा जाहीर केली तेव्हा एक टक्का मतदान वाढले होते. हे मतदान सुमारे 78 लाख इतके आहे. या वाढलेल्या 1% वर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेप घेतला आहे.
या मतदानावर संशय घेतला आहे. त्याबद्दलचे थेट तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर आता आयोगानेच दिनांक 3 डिसेंबर रोजी सर्व विरोधी पक्षांना बोलावले आहे. या बैठकीत या आक्षेपाचे, संशयाचे निराकरण आयोगाकडून केले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ईव्हीएम मशीन बद्दलचे आक्षेप फेटाळून लावले आहेत.
त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्र विभागाचे आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्षेपाबद्दल खुलासा करून शंकेचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यावर समाधान झाले नाही म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवले आहेत. आता त्याबद्दल तीन डिसेंबर रोजी स्पष्टता केली जाईल. राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी या पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडलेले नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे(Congress) नेते या पराभवाला जबाबदार असल्याचे म्हटल्यामुळे, इतर पक्षांची मोठी अडचण झाली आहे.
शरद पवार यांनी अगदी सुरुवातीला ईव्हीएम मशीन वर संशय व्यक्त केलेला नव्हता. आपण तज्ज्ञांची मते घेऊन त्यानंतर आपण बोलू असे त्यांनी सांगितले होते. आता ते शेवटची एक टक्का मते जी वाढलेली आहेत त्याबद्दल संशय व्यक्त केला आहे. पराभव का झाला यासाठीची काही कारणे शोधावी लागतात. त्याप्रमाणे त्यांनी वाढीव मतावर संशय व्यक्त केला आहे. पण त्याचबरोबर महायुतीला मोठे यश काय मिळाले याचीही कारणे सांगितली आहेत. महायुतीने सत्तेचा गैरवापर केला, निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांच्याकडून पैशाचा महापूर आणला गेला. असा आरोप त्यांनी केला आहे. याचा अर्थ त्यांनी सुद्धा ईव्हीएम मशीन महाविकास आघाडीच्या पराभवाला जबाबदार नाही असे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
क्वीन परतली! ऐश्वर्या रायचा खास फोटो व्हायरल…
अरविंद केजरीवालांवर जीवघेणा हल्ला; दिल्लीत नेमकं झालं काय?
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत