कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राज्यात महायुतीचे नवीन सरकार अस्तित्वात येतात मनोज जरांगे पाटील हे नेहमीप्रमाणेच आमरण उपोषण सुरू करणार आहेत. उपोषण कुठे करायचे? अंतरवाली सराटी या गावात की राजधानी मुंबईत हे अद्याप निश्चित व्हायचे आहे. त्यांचे आंदोलन हे सुरुवातीला सामाजिक होते. आणि आता ते राजकीय(political) बनले आहे.
कारण एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे(political) ते बोलू लागले आहेत. मराठा आरक्षणाचे मारेकरे म्हणून त्यांनी दीड दोन वर्षे ज्यांना रडारवर घेतले होते तेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत किंवा तशी दाट शक्यता आहे. म्हणूनच मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषण आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे पण त्याचबरोबर त्याचे सामाजिक मूल्यांकनही कमी होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या आरक्षण आंदोलनाला सकल मराठा समाजाचा सुरुवातीपासून पाठिंबा आहे आणि तो प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत राहणार आहे. त्यांच्या आंदोलनामागे ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत हेही आता फारसे लपून राहिलेले नाही. रीतसर मागण्यांची तड लावण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे आणि आंदोलन हे एक प्रकारचे हत्यार आहे. हे हत्यार बोथट होऊ नये, त्याची धार कमी होऊ नये असे काही संकेत आहेत. आमरण उपोषण हे सुद्धा त्यापैकीच एक धारदार हत्यार आहे पण हे हत्यार बोथट तर होत नाही ना याचा विचार केला गेला पाहिजे. बेमुदत संप आणि आमरण उपोषण हे आंदोलनातील सर्वात टोकदार टप्पे मानले जातात.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्यानंतर सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ते सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग करणार होते. सुरुवातीला ते सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार देणार होते आणि नंतर 25 जागा त्यांनी निश्चित केल्या होत्या. त्याची घोषणा केली आणि घोषणेचा आवाज हवेत विरण्यापूर्वीच त्यांनी माघारही घेतली. त्यांचा लढा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर होता हे अनेकदा स्पष्ट झाले होते. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विषयी थेट कधीच बोलत नव्हते मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
विधानसभा निवडणुकीत आमची राजकीय समीकरण जुळली असती तर आम्ही सुपडासाफ केला असता. असे ते म्हणतात. त्यांना अभिप्रेत असलेल्यांचा सुपडासाफ झाला असता तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रश्न सुटला असता का? त्यांची राजकीय(political) समीकरणच जुळली असती तर नेमका कुणाचा सुपडासाफ झाला असता हे त्यांनी सांगितलेले नसले तरी सर्वसामान्य लोकांना ते माहित आहे. त्यांना महायुती अभिप्रेत होती आणि आहे.
मनोज जरांगे पाटील हे प्रस्थापितांना या निवडणुकीत पराभूत करणार होते. तसे त्यांनी वारंवार सांगितले होते.
पण महायुतीला जे फार मोठे यश मिळालेले आहे ते मराठा आणि ओबीसी समाजामुळे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. याचा अर्थ मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर या विधानसभा निवडणुकीत नव्हता असा होतो.
आता पुन्हा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार आहेत. त्यांचे हे आंदोलन अंतरवाली सराटी किंवा मुंबईत होईल. महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात येण्याच्या प्रतीक्षेत ते सध्या आहेत. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत हे महायुतीने यापूर्वी सातत्याने सांगितले आहे. याचा अर्थ ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. आणि हे मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही. आणि म्हणूनच नजीकच्या काळात आरक्षणाचा तिढा सुटणार नाही. राज्य घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची 50% ची मर्यादा वाढवल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे अशक्य आहे.
हेही वाचा :
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचीही उडी, राज्यभरात उभारणार जनआंदोलन
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! सिगारेट, तंबाखू, शीतपेये महागणार
अभिनेत्री समुद्र किनाऱ्यावर योगा करत असताना लाटांच्या तडाख्यात गेली वाहून Video