सोलापूर : राज्याच्या शासकीय विभागांमध्ये विशेषतः 42 विभागांमध्ये सद्यःस्थितीत अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. शासनाचे कामकाज गतिमान व्हावे, वैयक्तिक लाभार्थीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या हेतूने दरवर्षी 50 हजार पदांच्या मेगाभरतीचे(recruitment) नियोजन नवीन महायुतीने केले आहे. प्रत्येक विभागांमधील रिक्त पदे व पहिल्या वर्षी कोणती पदे भरणे जरुरी आहे, याची माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत दरवर्षी 10 लाख सुशिक्षित तरुण-तरुणींना विविध शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी सहा ते 10 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जात आहे. रिक्तपदे पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत.
सद्यःस्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या सहा लाख अर्जदारांपैकी 75 टक्के तरुण-तरुणींनी शासकीय विभागांमध्येच प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे. त्यातून शासकीय विभागांमध्ये रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याची बाब समोर आली आहे.
राज्य शासनाने यापूर्वीच अनेक शासकीय विभागांमधील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य, उद्योग अशा विभागांमध्ये भरती(recruitment) देखील झाली आहे. आता २०२५-२६ या वर्षातील ५० हजार पदांची भरती शासनच करणार आहे, पण ती कंत्राटी असणार की शासकीय भरती, यावर अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
दुसरीकडे यापूर्वी 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन झाले होते, पण त्यातील २१ हजार पदांचीच भरती झाली आहे. अजूनही ९ हजार पदे रिक्त असून तेही ७० टक्क्यांच्या प्रमाणात आहे. उर्वरित ३० टक्के म्हणजेच अजूनही शाळांमध्ये १५ हजारांवर शिक्षक कमीच आहेत. त्याही भरतीचे नियोजन सुरु आहे.
कृषी, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, उद्योग, मराठी राजभाषा विभाग, गृह, शालेय शिक्षण, महसूल, या विभागांमधील पदे देखील पुढच्या पाच वर्षात भरली जाणार आहेत. निश्चितपणे येत्या नवीन वर्षात तरुणांना शासकीय नोकरभरतीची संधी मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा :
या मूलांकांच्या लोकांची कायदेशीर अडचणीतून सुटका होण्याची शक्यता
शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्…; 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार
यंदा विराट कोहली नाही तर ‘हा’ युवा क्रिकेटर बनू शकतो RCB चा नवा कर्णधार