कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राज कपूर आणि भालजी पेंढारकर, राज कपूर आणि कोल्हापूर(Kolhapur), राज कपूर आणि पन्हाळा यांचं असं एक अतूट नातं होतं. आर के बॅनर खाली एकूण 18 चित्रपटांचे निर्माण करण्यात आले. आणि प्रत्येक चित्रपटात दीड दोन मिनिटांचा का असेना पण एक तरी सीन कोल्हापूरच्या रम्य परिसरात चित्रित केलेला असायचा. त्यांच्या चेहऱ्याला पहिला रंग लागला तो कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत.
बालाजींच्या वाल्मिकी या चित्रपटात त्यांनी नारद मुलीची भूमिका साकारली होती. त्यांना मानपत्र देऊन कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेने सन्मानित केले होते. त्यांचा अर्ध पुतळा वाशी नाका परिसरात उभारण्यात आला आणि त्याचे अनावरण त्यांचे बंधू शशी कपूर यांनी केले होते. काल शनिवारपासून राज कपूर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या राजभक्तांनी त्यांच्या आठवणी जागवल्या.
राम तेरी गंगा मैली हा चित्रपट कोल्हापूरच्या लक्ष्मी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. त्याच्या रौप्य महोत्सवी
कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली होती. कोल्हापुरातील काही कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी राज कपूर हे एक दिवसाच्या मुक्कामासाठी कोल्हापुरात आले होते. सतेज पाटील यांचे आजचे अजिंक्यतारा कार्यालय आहे ते पूर्वी प्रथम श्रेणीतील हॉटेल होते. या हॉटेलमध्ये राज कपूर हे उतरले होते. त्यांनी कोल्हापूरच्या पत्रकारांशी संवाद साधला होता.
त्यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या(Kolhapur) रांगड्या संस्कृतीबद्दल एक वेगळ्या प्रकारचे भाष्य केले होते. कोल्हापूरचे लोक हे सरळ मार्गी आहेत. त्यांना मी पूर्वी कधीतरी पन्हाळा कुठे आहे असे विचारले होते तेव्हा रस्त्यावरच्या लोकांनी असंच “सरल” जावा. असे सांगितले होते. माणसाने कधीही सरळ मार्गाने जावे. हे मी कोल्हापुरात शिकलो. त्यांनी पत्रकारांशी बऱ्याच गप्पा मारल्या. त्यानंतर ते गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयातील श्रीकृष्ण मंदिराच्या उद्घाटनासाठी गेले होते.
सायंकाळी शाहू खासबाग मैदानात त्यांना कोल्हापूर नागरिकांच्या वतीने महापालिकेने मानपत्र देऊन सन्मानित केले होते. त्यादिवशी रंगपंचमी होती आणि रंगीबेरंगी झालेले हजारो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यादिवशी राज कपूर हे भालजी पेंढारकर यांची भेट घेण्यासाठी जयप्रभा स्टुडिओ मध्ये पोहोचले. तेव्हा भालजी यांची प्रकृती खालावली होती. ते कुणाला भेटू शकत नव्हते. त्यामुळे मग ज्या खोलीमध्ये भालजी यांना ठेवले होते त्या खोली समोरची माती राज कपूर यांनी आपल्या कपाळाला लावली. त्यांच्याकडून भालजींना मिळालेली ही आगळीवेगळी मानवंदना होती. संपूर्ण कपूर कुटुंबीय भालजी यांना देवासमान मानत होते. चेंबूर येथे राज कपूर यांनी आर के स्टुडिओ उभारला, त्यामध्ये भालजी पेंढारकर यांचे योगदान मोठे होते.
सुमारे 75 वर्षांपूर्वी पृथ्वीराज कपूर हे त्यांची पृथ्वी थिएटरची नाटके सादर करण्यासाठी कोल्हापूरला येत असत. त्यांच्याबरोबर राज कपूर, शम्मी कपूर, शशि कपूर ही त्यांची मुले ही येत असत. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला लागून शर्मा यांचे बंगाली स्वीट मार्ट या नावाचे हॉटेल होते (सध्या तेथे सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस आहे) या हॉटेलमधील मलई राज कपूर यांची आवडती डिश होती. बशी मध्ये दुधाची मलई घेऊन ते स्वीट मार्ट च्या बाहेरच चमच्याने मलई खात असत.
राज कपूर यांच्या आरके स्टुडिओमध्ये कथा विभागात, संगीत विभागात बहुतांशी मराठी मंडळी असत. त्यांच्या गाडीवरील शिंदे नामक चालक हे कोल्हापूरचेच रहिवासी होते.
कोल्हापूर(Kolhapur) महापालिकेचे एक कर्मचारी संभाजी पाटील हे त्यांचे जगा वेगळे चाहते होते. इसवी सन 1989 मध्ये राज कपूर यांचे निधन झाले तेव्हा संभाजी पाटील हे त्यांच्या स्कूटरवरून मुंबईला अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी गेले होते. याच संभाजी पाटील यांनी 1995 मध्ये कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर वाशी नाका येथे राज कपूर यांचा पुतळा उभारला आणि त्याचे अनावरण शशी कपूर यांच्या हस्ते झाले होते. तर असे हे राज कपूर,”फिर भी दिल है हिंदुस्तानी”असे रशियामध्ये जाऊन म्हणत होते. कारण भारता इतकेच रशियामध्ये त्यांचे चाहते प्रचंड होते.
हेही वाचा :
मंत्रिमंडळाचा शपथविधी अन् भाजपची नवी खेळी…
हा कोणाता ट्रेंड… 36 तासांत 3 दिग्गजांनी घेतली निवृत्ती!
मोबाईल फोन जप्त केल्याने विद्यार्थ्याने थेट शिक्षकांवर केला चाकूने हल्ला, Video Viral