मंत्रीमंडळात डावलल्याने छगन भुजबळ नाराज, घेणार मोठा निर्णय?

नागपूर येथील राजभवन येथे काल 16 डिसेंबररोजी महायुती सरकारचा मंत्रीमंडळ(cabinet) विस्तार पार पडला.यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यावेळी भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादीने धक्कातंत्र वापरले. महायुतीत अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले आहे. अशात त्यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलंय.

आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्रिमंडळाचा(cabinet) शपथविधी रविवारी पार पडला. त्याच्या काही तासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार निवासासमोरच्या देशपांडे सभागृहात पक्षाचा मेळावा आणि नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा ठेवला होता. या मेळाव्याला अनेकांची उपस्थिती होती.

मात्र, छगन भुजबळ यांनी या मेळाव्याला हजेरी लावली नाही. मंत्रिपदापासून डावलले गेल्यामुळे छगन भुजबळ कमालीचे संतप्त झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. भुजबळांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि समीर भुजबळांच्या बंडखोरीचे कारण पुढे करीत भुजबळांचा पक्षाने एकप्रकारे करेक्ट कार्यक्रम केल्याचं म्हटलं जातंय.

आता नाराज छगन भुजबळ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राष्ट्रवादीत जेव्हा बंड झालं तेव्हा भुजबळ हे शरद पवार यांची साथ सोडणार नाहीत, असं म्हटलं जात होतं. मात्र, त्यांनी अजित पवार यांची साथ निवडली. भाजपने महाराष्ट्र सदन प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भुजबळांना तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या फूटीनंतर भुजबळ त्याच भाजपसोबत मिळून आता सत्तेत सामील झाले आहेत.

भाजपसोबत गेल्यानंतर भुजबळांना ‘ईडी’कडूनही दिलासा मिळाला होता. त्यातच राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षणातही भुजबळ यांनी थेट उडी घेत मराठा समाजाचा रोष पत्करला. भुजबळ यांना अडवले तर ओबीसी समाज नाराज होईल आणि नाही अडवले तर मराठा समाज, अशी अडचण तेव्हा अजित पवारांसमोर उभी झाली होती.

महायुतीचे सरकार आल्यानंतर अजित पवार यांनी भुजबळ यांचा पत्ताच आता कट केलाय. त्यांना महायुतीच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या मराठा आरक्षणाला विरोध, भ्रष्टाचाराचे आरोप आणि पुत्र व पुतण्यावरील प्रेमामुळे भुजबळांना मंत्रीपदापासून वंचित ठेवले गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा :

आज सोमवारी महादेव कुणावर करणार सुखाचा वर्षाव?

कलाविश्वात शोककळा! जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन

चाणक्य नीतीचा सोन्याचा नियम: श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली, फक्त या गोष्टींवर करा खर्च!