काँग्रेसमध्ये असंतोषाची लाट! पटोले नको ठाकरे हवेत; बैठकीतील आतली बातमी फुटली

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. आघाडीतील तिन्ही पक्षांची दाणादाण उडाली. काँग्रेसला फक्त १६ जागा जिंकता आल्या. या निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसमध्ये(Congress) असंतोष धुमसू लागला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळेच पराभव झाला अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पटोलेंना हटवून त्यांच्या जागी पश्चिम नागपूर मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी नागपूर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.

काँग्रेसचे(Congress) नागपूर शहर उपाध्यक्ष रमण पैगवार यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या पराभवासाठी नाना पटोलेच जबाबदार असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नाही हेच समोर आले आहे. काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधक कमी करण्यात नेमकी कुणाची भूमिका आहे असा प्रश्न आता थेट विचारला जाऊ लागला आहे.

नागपूर शहराचा विचार केला तर येथील सहापैकी फक्त दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाचा त्याग केला. तरीही पटोलेंनी काहीच केले नाही. पक्षात सोशल इंजिनिअरिंगही कुठे दिसले नाही. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही. या सर्वांसाठी नाना पटोलेच जबाबदार होते. त्यामुळेच पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले असा आरोप पैगवार आणि काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केला.

अशा परिस्थितीत नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करावी. त्यांच्या जागी पक्ष संघटनेचा अनुभव असलेले आमदार विकास ठाकरे यांची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचीही तशीच इच्छा असल्याचे सांगितले जात आहे. आता यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी खरंच काही निर्णय घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. काँग्रेसलाही मोठा धक्का बसला. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले. कसेतरी 16 आमदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. काँग्रेसचा स्ट्राईक रेटही कमालीचा घसरला. निवडणुकीत इतका मोठा पराभव पदरी का पडला याची कारणं शोधली जात आहेत. यातच काँग्रेस नेत्यांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर देखील फोडलं जात आहे.

हेही वाचा :

१० मिनिटांमध्ये सकाळच्या डब्यासाठी बनवा चमचमीत बटाट्याच्या काचऱ्या

छगन भुजबळांना मिळणार मोठी जबाबदारी; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

‘मंत्री करा, अन्यथा..’, ‘या’ आमदारासाठी शिंदे गटात सामूहिक राजीनाम्याची तयारी?