‘तो’ इशारा कळल्याने अनर्थ टळला! बाईकपासून काही फुटांवरुन वाघाने…

चंद्रपूर जिल्ह्यामधील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये (tiger)हिवाळ्यात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ताडोबामधील वाघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या या व्याघ्रप्रकल्पामधील एका थक्क करणाऱ्या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ पर्यटकांच्या जीप फेरीतील वगैरे नसून अचानक डांबरी रस्त्याच्या कडेला वाघ दिल्यानंतर नेमकं काय घडलं याचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील(tiger) हा व्हिडीओ व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील आहे. बफर श्रेत्रात असलेल्या मोहर्ली-कोंडेगाव रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर अचानक वाघ आला. दुचाकीस्वार कोंडेगाव येथून मोहर्लीकडे जात असताना हा प्रकार घडला.

डांबरी रस्त्याच्या बाजूला एका झाडामागे उभा असलेला वाघ रस्ता ओलांडण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा वाघाचं चित्रीकरण करत होते. हा वाघ आता रस्ता ओलांडणार असल्याचं बंडा यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला हाताच्या इशाऱ्यानेच थांबण्यास सांगितलं.

सुदैवाने या दुचाकीस्वाराने बंडा यांनी केलेला इशारा पाहिला आणि तो आहे त्या जागी थांबला. खरं तर बंडा यांचा हा इशारा पाहून दुचाकीस्वार थांबला तेव्हा तो रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघापासून काही फुटांवरच होता. बेसावधपणे हा दुचाकीस्वार पुढे आला असता तर कदाचित रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्लाही केला असता. बंडा यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे असला अनर्थ टळला. त्यांनी दुचाकीस्वाराला संभाव्य धोक्याचा अंदाज घेत वेळीच थांबवलं आणि रस्ता रिकामा दिसल्याने वाघाने अगदी वेगात रस्ता ओलांडला.

बंडा आणि या दुचाकीस्वारामध्ये असलेल्या काही फुटांच्या अंतरावरुन वाघाने रस्ता ओलांडला. हा सारा थरार अरविंद बंडा यांच्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख भागात सुमारे 60 व बफर झोन (प्रत्यारोधी क्षेत्र) यात सुमारे 15 वाघ आढळले आहेत. त्यामुळेच या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या गावांमधील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला कायमच दिला जातो.

हेही वाचा :

केंद्र सरकारची मोठी कारवाई! 80 लाख सिमकार्ड अचानक ब्लॉक

काँग्रेसमध्ये असंतोषाची लाट! पटोले नको ठाकरे हवेत; बैठकीतील आतली बातमी फुटली

१० मिनिटांमध्ये सकाळच्या डब्यासाठी बनवा चमचमीत बटाट्याच्या काचऱ्या