रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती(political) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, असे सूचक वक्तव्य केले आहे.
छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर ओबीसी समाजाकडून आंदोलन केले जाणार आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये आता हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी अजित गटाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देणार असल्याचा इशारा दिला आहे.
मंत्रीमंडळातून डावलण्यात आल्याने छगन भुजबळ हे काल नागपूरचे अधिवेशन सोडून तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल झाले. छगन भुजबळ आज नाशिक आणि येवल्यात त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात छगन भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. मात्र आता छगन भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
छगन भुजबळ(political) यांना मंत्रिमंडळात स्थान नाही हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. उद्या नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समता परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर छगन भुजबळ आपली भूमिका मांडणार आहेत. छगन भुजबळ यांना पक्षात अपमानाची भूमिका मिळणार असेल तर आम्ही सर्व एक मुखाने राजीनामा देणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खेरे यांनी दिला आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. “साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत”, असा आशयाचे बॅनर भुजबळांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म बाहेर झळकले आहेत. या बॅनरवर छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह समता समता परिषदेच्या दिलीप खैरेंचा फोटो आहेत. तर छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी भुजबळ फार्म या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून छगन भुजबळ हे येवला येथे त्यांच्या समर्थकांशी चर्चा करणार आहेत. आता छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
5 आमदार असतानाही सांगलीला मंत्रिपद नाहीच; पालकमंत्री उपराच मिळणार?
पतंजलीला उच्च न्यायालयाचा दिलासा; साडेचार कोटींच्या दंड आदेशाला स्थगिती
‘पुष्पा 2’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार? जाणून घ्या कधी व कुठे