आता 10 मिनिटांत किराणा घरपोच मिळणार…

ओला ही कंपनी तुम्हांला तुमच्या प्रवासासाठी कॅबची सेवा पुरवते. मात्र, आता हीच ओला कंपनीची कॅब तुम्हांला तुमच्या घरी पीठ, मीठ आणि इतर किराणा सामानाची(Grocery) डिलिव्हरी करण्यासाठी देखील उपयोगात पडणार आहे.

विशेष म्हणजे कंपनी ही सेवा केवळ 10 मिनिटांत ग्राहकांना पुरवणार आहे. होय, ओलाने घरपोच किराणा(Grocery) सामान पोहोचवण्याची सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे आता 10 मिनिटांत ग्राहकांना सर्व दैनंदिन वस्तू घरपोच मिळणार आहे. यासंदर्भातील माहिती ओला कॅबच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे.

भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या कंपनी ओला कॅब्स ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) प्लॅटफॉर्मद्वारे द्रुत वितरण बाजारात प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर ओला कॅब्स खात्यावर ओला किराणा सेवेची घोषणा करताना, ही सेवा आता देशभरात पुरवली जाणार आहे. ज्याद्वारे वापरकर्त्यांना केवळ 10 मिनिटांत आवश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी मिळू शकणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

ओलाने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे की, या ओला डिलिव्हरी सर्व्हिसचा वापर करून किराणा ऑर्डर केल्यास 30 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तर फ्री होम डिलिव्हरी सेवाही देण्यात येणार आहे. याशिवाय वापरकर्त्यांना त्यांच्या ऑर्डरची डिलिव्हरी शेड्यूल करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे.

एका मोठ्या कंपनीने भारतातील द्रुत वितरण क्षेत्रात प्रवेश केला आहे. कॅब सेवा पुरवणारी कंपनी ओलाच्या प्रवेशानंतर, या क्षेत्रात स्पर्धा आणखी वाढणार आहे. सध्याच्या घडीला झेप्टो, ब्लिंकिट, फ्लिपकार्टसह अनेक लहान-मोठ्या कंपन्या देशात जलद होम डिलिव्हरी सेवा देत आहेत. यामध्ये फ्लिपकार्ट सर्वात नवीन आहे. त्यानंतर आता ओलाने प्रवेश केला आहे.

भारतामध्ये क्विक कॉमर्स मार्केट खूप वाढले आहे. कोरोनाच्या काळात ई-कॉमर्स आणि 10 मिनिट होम डिलिव्हरी सेवा लोकप्रिय झाल्या आहेत. मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ब्लिंकिटचा या मार्केटमध्ये सर्वाधिक 46 टक्के हिस्सा आहे. त्यानंतर झेप्टो 29 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर स्विगी इन्स्टामार्टचा बाजार हिस्सा 25 टक्के वेगाने वाढत आहे. द्रुत व्यापारावरील वाढत्या अवलंबित्वामुळे अनेक ई-कॉमर्स दिग्गज कंपन्यांना या शर्यतीत सामील होण्यास भाग पाडले आहे.

हेही वाचा :

‘पुष्पा 2’ पाहायला गेला आणि चांगलाच फसला, सिनेमागृहात एकच थरार

“‘या’ अभिनेत्याचा धाडसी स्टंट: जळते मेण चेहऱ्यावर ओतले, पाहा व्हायरल व्हिडीओ”

गौतम अदानी यांची मोठी डील; या क्षेत्रात केलीये धमाकेदार एन्ट्री, 400 कोटींमध्ये झालाय व्यवहार