साईंच्या शिर्डीतला संकल्प आणि जन आक्रोशाचा विकल्प

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : श्रद्धा आणि सबुरी असा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी मध्ये भारतीय जनता पक्षाचे नुकतेच अधिवेशन झाले. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आक्रमक शैलीतील भाषण झाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचीच(political updates) सत्ता असली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले पाहिजे असे आवाहन या अधिवेशनात करण्यात आले मात्र या अधिवेशनात संघटनात्मक पातळीवर फारशी चर्चा झाली नाही. सत्तेवर श्रद्धा आणि जो कोणी येईल त्याचा पूर्व इतिहास न पाहता त्याच्याशी सबुरीने घ्यायचे याच मंत्राचा जप या अधिवेशनात करण्यात आला.

याशिवाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी यावेळी साधण्यात आली नाही तरच नवल! खऱ्या अर्थाने फकीरी आयुष्य जगलेल्या साईबाबांच्या शिर्डी मध्ये झालेले भारतीय जनता पक्षाचे हे अधिवेशन श्रीमंतीचे आणि झगमगाटी होते.

विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पण मोठे यश मिळाले. महाराष्ट्राची सत्ता सूत्रे भाजपच्या हाती आली. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची(political updates) मतदारांनी पार वाट लावून टाकली. या दुहेरी आनंदाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन झाले. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यावे यासाठी साईबाबांच्या शिर्डी ची निवड अधिवेशनासाठी करण्यात आली होती. या अधिवेशनाला सरकारी विरोधी काढण्यात येत असलेल्या जन आक्रोश मोर्चाची किनार होती. राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा संकल्प या अधिवेशनात करण्यात आला म्हणजे एका अर्थाने या निवडणुकांच्या प्रचाराचा प्रारंभ या अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रात सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आलेली हत्या आणि वाल्मीक कराड याचे खंडणी प्रकरण गाजत आहे. संपूर्ण राज्यभर त्याचीच चर्चा सुरू आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि हे मुंडे महाशय देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांना भाजप प्रणित महायुती सरकारने अभय दिले असल्याचे वातावरण सध्या आहे.

भाजपला चांगलेच अडचणीत आणणारे हे प्रकरण असून अशा प्रतिकूल वातावरणात भारतीय जनता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवायची आहे. वास्तविक धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून निष्कासित करण्याचे अधिकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आहेत पण हा अधिकार ते वापरू शकत नाहीत. आघाडी धर्म आडवा येतो आहे. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांची सावली आहे हे लपून राहिलेले नाही.

साऱ्या महाराष्ट्रात तशी चर्चा सुरू आहे आणि त्याबद्दल देवेंद्र फडणवीस हे स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मीक कराडचे कारणाने हे दोन्ही विषय आणखी दोन-तीन महिने चर्चेत असणार आहेत आणि याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आणि त्या भारतीय जनता पक्षाला जिंकायच्या आहेत. त्या जिंकायच्या असतील तर धनंजय मुंडे यांच्यासारखा पायात काट्यासारखा येणारा फॅक्टर बाजूला करावा लागेल. त्यासाठी सरकारमध्ये असलेल्या अजितदादा पवार यांच्यावर फडणवीस यांना दबाव टाकावा लागेल.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार(political updates) आणि उद्धव ठाकरे या दोघांचाही दारुण पराभव झाला. पण तरीही महाराष्ट्रात भाजपाचे हे दोघे तुल्यबळ राजकीय शत्रू आहेत आणि म्हणूनच शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात बोलताना अमित शहा यांनी या दोघांच्या वर चौफेर टीका केली. महाराष्ट्रातील शरद पवार यांचे राजकारण भारतीय जनता पक्षाने वीस फूट जमिनीखाली गाडून टाकले. तर उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दोन्ही काँग्रेसशी सोयरीक केली अशी टीका अमित शहा यांनी केली.

महाराष्ट्रात येऊन एकीकडे या दोघांच्या वर टीका करायची आणि अप्रत्यक्षपणे या दोघांनीही एनडीए मध्ये यावे असे प्रयत्न करायचे. तशी चर्चा घडवून आणायची. या दोघांविषयी संभ्रम निर्माण करायचा ही भाजपची नीती लपून राहिलेली नाही. ही नीती वापरून एनडीए मध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या नितेश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पायात साप सोडायचा. तुम्ही गेलात तर आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत असा एक संदेश सुद्धा या दोघांना द्यायचा असे भारतीय जनता पक्षाचे सध्याचे धोरण आहे.

हेही वाचा :

धनुषचा अनोखा अंदाज: चाहत्यांना ‘पोंगल’च्या शुभेच्छा आणि आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!

इंजिनिअर पती पत्नीसमोरच ठेवायचा प्रेयसीसोबत लैंगिक संबंध, दोघींनी मिळून केली हत्या अन् जाळला मृतदेह

महिला नागा साधूंनाही नग्न व्हावे लागते का? काय आहेत नियम? रहस्यमयी ठिकाणी असतं वास्तव!