मोठी बातमी! वाल्मिक कराडला न्यायालयाचा मोठा झटका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन(court) कोठडी सुनावली आहे. बीड न्यायालयाने आज हा निर्णय दिला. खंडणी आणि मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवर कारवाई करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने आज न्यायालयात(court) दिली. वाल्मिक कराडला बुधवारी (22 जानेवारी) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, हा या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे.

29 नोव्हेंबर 2024 चे हे सीसीटीव्ही फुटेज असून, ज्या दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती, त्याच दिवशी सर्व आरोपी केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयात एकत्र आल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. या व्हिडिओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर आरोपी दिसत आहेत.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये केज पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे देखील वाल्मिक कराडसोबत दिसत आहेत. त्यामुळे राजेश पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आवादा कंपनीत झालेल्या मारामारीनंतर एक दिवसानंतर राजेश पाटील एका हॉटेलमध्ये आरोपींसोबत दिसले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राजेश पाटील आरोपींसोबत दिसून आल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटील यांची देखील चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने त्याला जामीन मिळणे अवघड असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. वाल्मिक कराड याने 31 डिसेंबरला पुणे सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली होती, तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

हेही वाचा :

मोफत, मोफत, मोफत…! भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज , IND vs ENG दुसऱ्या T20 साठी…

भीषण अपघात! भरधाव ट्रक दरीत कोसळला; 10 ठार, 15 जखमी

कुंभमेळ्यामध्ये आग लागली नाही तर लावली…; ‘या’ खालिस्तानी संघटनेने घेतली जबाबदारी