टक्कल पडणे, गंभीर प्रश्न उत्तराच्या शोधात टक्कल ग्रस्त

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : टक्कल(Baldness) पडण्याचा संबंध बुद्धिमत्तेशी लावला जायचा. टक्कल हे विद्वत्तेचे प्रतीक मानले जायचे. या विद्वान मंडळींना त्यांचे टक्कल हे विवाहासाठी अडचण ठरत नव्हते. आत्ताही अतिउच्च शिक्षित, लाखाच्या पटीत पगार, बंगला, कार असलेल्या पण डोक्यावर केस नसलेल्या तरूणांना, लग्नाळू तरुणी आपला जोडीदार म्हणून पसंत करतात.

फारसे शिक्षण नाही, चांगल्या पगाराची नोकरी नाही. आणि त्यातही डोक्यात टक्कल(Baldness). अशी प्रतिकूल परिस्थिती असलेल्या तरुणांची संख्या खूप मोठी आहे. त्यातही घरदार आहे, चांगली नोकरी आहे मात्र डोक्यावर टक्कल असल्याने त्यांना स्थळ चालून येत नाही, अशा तरुणांची संख्या ही मोठी आहे. अशावेळी कुणीतरी सांगितले की टकलावर केस येण्याचे माझ्याकडे प्रभावी औषध आहे आणि तेही मोफत आहे. तर असा उपचार घेण्यासाठी टक्कल ग्रस्तांची गर्दी नाही झाली तरच नवल! असाच कोणी एका सलमान नामक वैदु केस उगवून देतो म्हणून कोल्हापुरात आला. आणि महावीर उद्यानात टक्कलग्रस्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

कोल्हापूर शहर, जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यातून टक्कल(Baldness) ग्रस्त महावीर उद्यानात येऊ लागले. जडीबुटी पासून बनवलेले तेल तो टक्कलावर ब्रशने लावू लागला. प्रसार माध्यमात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. देश परदेशातील औषध कंपन्यांना टकलावर केस उगवण्याचे औषध अद्याप तयार करता आलेले नाही आणि हा कुणी सलमान आपल्याकडे शंभर टक्के गुण येण्याचे औषध असल्याचा दावा करू लागला.

वैद्यक शास्त्र विभागाचेही त्यामुळे कुतूहल वाढले. आता आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर हे कोल्हापूरचे आणि त्यातही पालकमंत्री. त्यांनी सलमान कडून होत असलेल्या उपायांची गंभीरपणे दखल घेतली आणि अशी बनवेगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला. अशा प्रकारचा कोणी सलमान कुठेही दिसला आणि त्याने उपचार सुरू केले तर तेथील आरोग्य विभागाची मी गय करणार नाही. असा सज्जड त्यांनी दिला आहे.

काही वर्षांपूर्वी जोतिबाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीरे गावात नेत्र विकारावर उपचार या नावाखाली मोफत शिबिरे घेतली जात होती. गावचेच कुणीतरी वैदू उपचारासाठी आलेल्या लोकांच्या डोळ्यांमध्ये कुठल्यातरी वनस्पती पासून बनवलेले द्रव टाकत होते. अशाप्रकारे डोळ्यांमध्ये द्रव टाकून घेण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून लोकांची कुशीरे गावात गर्दी उसळली होती.

ही गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणावर होती की, कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाने कोल्हापूर ते कुशीरे खास बस सेवा सुरू केली होती. महिन्याभरात या परिवहन विभागाला लक्षावधी रुपयांचा नफा झाला होता. नंतर या प्रकाराकडे आरोग्य विभागाचे लक्ष गेले. आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उभारल्यानंतर ही नेत्र शिबिरे बंद पडली. या अशा प्रकारच्या नेत्र शिबिरातून कुशिरे ग्रामपंचायतीला प्रचंड नफा झाला होता.

एकूणच टक्कल(Baldness) ग्रस्तांची समस्या गंभीर आहे. त्यांची लग्न जुळत नाहीत. म्हणून तो एक सामाजिक प्रश्नही बनला आहे. टकलावर केश रोपण करता येते पण ते अतिशय महाग आहे. काही औषध कंपन्यांनी केशवर्धक तेल बाजारात आणले असले तरी त्याचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही. टक्कलाच्या बाबतीत केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाची झोप उडावी असा एक प्रकार महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील 15 ते 20 गावांमध्ये अचानक केस गळतीचे प्रकार वाढले. डोक्यावरून हात फिरवला तरी हातात केस येऊ लागले.

वैद्यकीय क्षेत्र सुद्धा या प्रकाराने चकित झाले. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने बुलढाणा जिल्ह्यात धाव घेतली. टक्कल(Baldness) ग्रस्तांची तपासणी केली पण हे नेमके कशामुळे होते आहे हे मात्र त्यांना शोधता आलेले नाही. टक्कल पडण्याची साथ आलेल्या गावांमध्ये सध्या वेगळ्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत. या गावावर अनेकांनी जणू अघोषित बहिष्कार टाकला आहे. गावामध्ये भाजीपाला येत नाही, दुधाचा पुरवठा केला जात नाही, नातेवाईक फिरकत नाहीत. टक्कल दृष्टांच्या या गावात बाहेरच्या गावातील कोणीही येत नाही.

या प्रकाराने वैद्यक क्षेत्र चक्रावून गेले आहे. अचानक गेलेले किंवा गळलेले केस पुन्हा येतील असा दिलासा तेथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला असला तरी, केस येण्याबद्दलची औषधी उपाय योजना मात्र सांगितली गेलेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाची तसेच टक्कल ग्रस्तांची झोप उडालेली आहे. वास्तविक अचानक उद्भवलेल्या या साथीकडे केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने अतिशय गांभीर्याने पाहिले पाहिजे. केस गळतीच्या या रोगाच्या मुळाशी आरोग्य विभागातील तज्ञांनी पोहोचले पाहिजे. प्रसंगी परदेशातील तज्ञांचे मार्गदर्शन यासंदर्भात घेतले गेले पाहिजे. कारण केस गळतीची ही साथ आज दहा-पंधरा गावापर्यंत मर्यादित आहे. उद्या तिचा फैलावसुद्धा होऊ शकतो.

हेही वाचा :

चहावाल्याची ‘ती’ अफवा जीवावर बेतली; क्षणात होत्याचं नव्हतं झालं, 13 जणांचा चिरडून मृत्यू

सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मटार ढोकळा

मोठी बातमी ! ठाकरे गटाला मिळणार विरोधी पक्षनेतेपद; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय