सामंजस्य कराराचे फलित, कोल्हापूर मात्र सदैव वंचित

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : डावोस मध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली. सुमारे 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक विविध कंपन्यांच्या कडून महाराष्ट्रात होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि गडचिरोली या पाच ठिकाणी या गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठे प्रकल्प उभे राहणार आहेत. नेहमीप्रमाणेच कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातील एकाही औद्योगिक वसाहतीमध्ये परकीय गुंतवणुकीचे प्रकल्प उभे राहणार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणी, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे हे अपयश मानावे लागेल.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मोठे प्रकल्प उभा राहू शकतील अशा औद्योगिक वसाहती कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः कोल्हापूर(Kolhapur) शहराला लागून आहेत. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उद्योजकांना आणि नामवंत कंपन्यांना उपलब्ध आहेत.

मात्र ही औद्योगिक वसाहत स्थापन केल्यापासून आजतागायत एकही मोठा प्रकल्प या वसाहतीमध्ये हम आणला गेलेला नाही. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 52% पेक्षाही अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारने विविध उद्योजकांशी एकूण 54 सामंजस्य करार केले. त्यामुळे परकीय गुंतवणूक आणखी वाढली आहे. या नव्या गुंतवणुकीमुळे सुमारे 16 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. पण या एकूण विकासात कोल्हापूर(Kolhapur) कुठेही दिसत नाही.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीही डावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत उपस्थिती लावून अशाच प्रकारचे काही लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. तेव्हाही त्यांच्याबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत होते आणि नुकत्याच झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत होते. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून रत्नागिरी येथे मोठा उद्योग उभारला जाणार आहे. आत्तापर्यंत विकासापासून खूप दूर असलेल्या गडचिरोलीमध्ये मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या जिल्ह्याला उद्योग नगरी म्हणून विकसित करण्याचा मानस देवेंद्र फडणवीस यांचा आहे.

नव्या गुंतवणुकीमुळे उभारल्या जाणाऱ्या उद्योगाच्या माध्यमातून सुमारे 16 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न कौतुकास्पद आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना, महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला स्थलांतरित झाले. गुजरातने महाराष्ट्राचे उद्योग पळवले.
महाराष्ट्राचे सरकार या विषयावर काही बोलावयास तयार नाही. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे हे मोठे अपयश आहे अशा प्रकारची टीका महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून केली जात होती.

त्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यांच्यावरही एकेकाळी देशात प्रथम क्रमांकावर असलेला महाराष्ट्र सहाव्या क्रमांकापर्यंत घसरला अशा प्रकारची टीका केली गेली. महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या ही फार मागे गेला. महाराष्ट्राच्या पुढे गुजरात सरकला आणि त्याला केवळ राज्यकर्ते जबाबदार असल्याचे विरोधकांच्या कडून मोठ्या आवाजात म्हटले जाऊ लागले.

विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 52% पेक्षाही अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली असल्याचा दावा पुराव्यासह केल्यानंतर विरोधकांची टीकेची धार कमी झाली. याच फडणवीसांनी सुमारे 16 लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती ही होणार आहे. मुंबई पुणे नाशिक रत्नागिरी आणि गडचिरोली येथील बिरोजगारांना आता रोजगार उपलब्ध होणार आहे.

कोल्हापूर(Kolhapur) शहरासह जिल्ह्यात तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. इथले हवामान चांगले आहे, मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, विज पुरवठा अखंडित आहे. कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. असे एकूण आश्वासक वातावरण असताना आत्तापर्यंत एकही मोठा उद्योग कोल्हापुरात आला नाही. परकीय गुंतवणूक असलेला एकही उद्योग पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नाही.

याबद्दल इथल्या राजकारण्यांना, आमदार आणि खासदारांना जबाबदार धरले पाहिजे. सर्वसामान्य जनतेने त्यांना जाबही विचारला पाहिजे. कोल्हापुरात मोठे उद्योग आले पाहिजेत, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या पाहिजेत, याचा विचार करण्यासाठी इथले आमदारा, खासदार एकत्र आले आहेत असे एकदाही घडलेले नाही. हेच कोल्हापूरचे दुर्दैव आहे.

हेही वाचा :

डोनाल्ड ट्रम्प यांना झटका! वादग्रस्त नागरिकता आदेशावर न्यायालयाकडून स्थगिती

‘जेलर’ फेम विनायकनचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल, बाल्कनीत येऊन गैरवर्तन

…म्हणून अजित पवार कांकाच्या बाजूला बसण्याऐवजी 1 खुर्ची सोडून बसले; खरं कारण पवारांनीच सांगितलं