कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : तब्बल 144 वर्षानंतर येणाऱ्या प्रयागराज येथील महाकुंभ(Maha Kumbh) मेळाव्यास सुरुवात होऊन जवळपास पंधरा दिवस झाले आहेत आणि या पंधरा दिवसात या कुंभमेळ्यात दोन महा संकटे आली आहेत. पहिले संकट हे अग्नी तांडवाचे होते, सुदैवाने त्यात जीवित हानी झाली नाही मात्र दुसरे महासंकट बुधवारी आले. भाविकांच्या गर्दीच्या चेंगराचेंगरी च्या या संकटात 30 पेक्षाही अधिक भाविकांचे जीव गेले तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या दोन महा संकटांमधून उत्तर प्रदेश येथील राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या समितीला गर्दीचे व्यवस्थापन जमले नाही असे या निमित्ताने म्हणावे लागेल.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2025/01/image-817.png)
भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारची संकटे येत असतात. त्याची तीव्रता कमी अधिक असते. सुमारे 30 वर्षांपूर्वी हरिद्वार येथील “हरी की पौरी”या घाटावर अशाच प्रकारची चेंगराचेंगरी होऊन काही जणांचे बळी गेले होते. या चेंगराचेंगरीत कोल्हापूरचे खासदार बाळासाहेब माने हे सुद्धा तेव्हा जखमी झाले होते. या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने अशा घटना पुन्हा होऊ नयेत याबद्दलच्या उपायोजना करणे आवश्यक होते किंवा त्या उपाययोजना केल्याही असतील पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही असे म्हणावे लागेल.
काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मांढरादेवीच्या यात्रेत अशाच प्रकारची चेंगराचेंगरी होऊन अनेकांचे बळी गेले होते. धार्मिक पर्यटन स्थळी झालेली ही महाराष्ट्रातील पहिली मोठी दुर्घटना होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने एक सदस्य चौकशी समिती नेमली होती. निवृत्त न्यायमूर्ती हे या घटनेची चौकशी करत होते. त्यानंतर त्यांनी आपला एक चौकशी अहवाल राज्य शासनाला सादर केला होता. या अहवालात केलेल्या शिफारशी प्रमाणे महाराष्ट्रातील मोठ्यायात्रांचे गर्दीचे नियोजन आणि नियंत्रण केले जाते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरी डोंगरावर होते. या जोतिबाच्या यात्रेला आंध्र कर्नाटक इथून भाविक येत असतात. एकाच वेळी सात ते आठ लाख भाविक या डोंगरावर येत असतात. या डोंगरावर चेंगराचेंगरी वगैरे होऊ नये याचे नियोजन पद्धतशीरपणे केले जाते. मांढरादेवीच्या दुर्घटनेनंतर अशा प्रकारची दुर्घटना महाराष्ट्रात कुठेही घडलेली नाही हे त्या त्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीचे यश आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2025/01/image-739-1024x1024.png)
उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे 144 वर्षानंतर महा कुंभमेळा(Maha Kumbh) सुरू झाला आहे. या महा कुंभमेळ्याला जगातून आणि भारतातून किमान 30 ते 40 कोटी लोक भेट देतील असे गृहीत धरून तेथील आपत्ती व्यवस्थापन समितीने उपाययोजना केल्या आहेत. या महा कुंभ मेळ्यात महिन्याभरात अर्थात कुंभ मेळ्याची सांगता होईपर्यंत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून खबरदारी घेतली होती.
दररोज पवित्र स्नान करण्यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियोजन स्थानिक पातळीवर अतिशय अचूकपणे करण्यात आले होते. पण कुठेतरी गफलत झाली आणि महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या काही तंबूंना अचानक आग लागली. 200 पेक्षा अधिक तंबू या आगीत भस्मसात झाले पण अवघ्या काही मिनिटात या आगीवर तेथील अग्निशमन यंत्रणांनी नियंत्रण मिळवले आणि आग पूर्णपणे विझवली. सुदैवाने या अग्निकांडात जीवित हानी झाली नाही.
बुधवारी मात्र गर्दीचा अंदाज चुकला, पहाटे संगम तेलावर स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. स्नान झाल्यानंतर बाहेर कसे पडायचे आणि कोणत्या दिशेने जायचे हे अनेकांना समजले नाही. त्यातच रस्त्याचा आडव्या असलेल्या कचराकुंड्यांमध्ये पाय अडकून काही भाविक खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून गर्दी गेली आणि काही क्षणात चेंगराचेंगरी सुरू झाली. महा कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या रात्री गंगा स्नान केल्याने मनशांती मिळते तसेच शरीर शुद्ध होते म्हणून गंगा स्नानासाठी गर्दी उसळली होती आणि त्यातून चेंगराचेंगरी चे महासंकट भाविकांच्या वर कोसळले.
ज्यांचे जीव गेले त्यांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये अर्थसाह्य दिले जाणार आहे. मात्र इथे अमुल्य असा अनेकांचा जीव गेला आहे. त्याची नुकसान भरपाई पैशात करता येत नाही. या चेंगराचेंगरीत नेमके किती लोक बळी पडले हे सांगता येत नाही. बळींचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी या महा संकटाला कारण काय ठरले? आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांचा गर्दीचा अंदाज चुकला काय? शेंगराज चिंगरी चे महा संकट आले असताना त्याच्याशी सामना करण्यात स्थानिक प्रशासन अपुरे पडले काय? ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या लोकांच्या पासून काही अंतरावर का ठेवल्या गेल्या नाहीत? जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी उपलब्ध असलेली व्यवस्था अपुरी ठरली काय?
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2025/01/image-767.png)
पुरेशा प्रमाणात तेथे रुग्णवाहिका होत्या काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता उत्तर प्रदेश सरकारकडून न्यायालयीन किंवा तत्सम चौकशी समिती नियुक्त केली जाईल. कालांतराने चौकशी समितीचा अहवाल बाहेर येईल. व्यवस्थापनातील त्रुटी बाहेर येतील, भविष्यात असे काही घडू नये याचे नियोजन आत्तापासूनच केले जाईल, पण निष्पाप आणि आस्थेने प्रयागराज येथे गेलेल्या काही निष्पाप भाविकांच्या वर मृत्यूचा घाला पडलेला आहे. ही जीवित हानी भरून निघणारी नाही.
महा कुंभमेळ्याचे(Maha Kumbh) आयोजन आणि नियोजन नेटकेपणाने करण्यात आले होते. आपत्कालीन व्यवस्थापन समितीवर सर्वात मोठी जबाबदारी होती. या मेळ्यासाठी कितीतरी हजार कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. चेंगरा चेंगरी ची घटना घडून गेल्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन समितीने प्रयागराज च्या सीमेवर आलेल्या भाविकांना तेथेच रोखून धरले आहे. आतील लाखो लोक बाहेर गेल्याशिवाय बाहेर थांबलेल्यांना आत मध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही. येथून पुढे महागर्दी होणाऱ्या यात्रेला किंवा नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्याला जायचे की नाही याचा विचार केला गेला पाहिजे. प्रयागराज येथे घडलेली घटना लक्षात घेऊन नाशिक येथे आपत्कालीन व्यवस्थापन समितीला गर्दीचे नियोजन करावे लागणार आहे.
हेही वाचा :
875 दिवसांनी सचिन तेंडुलकरचं क्रिकेटमध्ये पुनरागमन, भारताचं नेतृत्व करणार
‘या’ वयात लग्न कराल तर वैवाहिक जीवनात व्हाल खुशाल, स्टडीत झाला खुलासा
मंत्रालयाची सुरक्षा मंत्र्यांकडूनच धाब्यावर? नरहरी झिरवाळांची कार्यकर्त्यांसह घुसखोरी?