सांगली : सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथे एका तरुणाच्या घरामध्ये दुर्मिळ आणि अत्यंत विषारी फुरसे जातीचा साप(snake) सापडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.
प्रशांत गायकवाड हे संध्याकाळी काम आटोपून घरी परतले. ते सोफ्यावर बसले असता, त्यांच्या नजरेस एका बॉक्सजवळ दोरीसारखे काहीतरी पडलेले दिसले. त्यांनी त्या वस्तूला उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती वस्तू दोरी नसून एक विषारी फुरसे जातीचा साप(snake) होता. प्रशांतने हात पुढे करताच सापाने तोंड उचलले. सुदैवाने प्रशांतने वेळीच हात मागे घेतल्याने ते गंभीर अपघातातून बचावले.
याबाबत त्यांनी तत्काळ सर्पमित्र हणमंत माळी यांना माहिती दिली. सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून साप सुरक्षितरीत्या पकडला आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
सर्पतज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्रात नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे चार प्रमुख विषारी साप आढळतात. यामध्ये फुरसे जातीचा साप सहसा कोकण भागात जास्त प्रमाणात दिसतो. हा साप प्रामुख्याने विंचू, सरडे आणि लहान किड्यांवर उपजीविका करतो. कुंडल परिसरातील डोंगराळ भाग हा या सापाचा नैसर्गिक अधिवास असल्याचे सर्पतज्ज्ञांनी सांगितले.
सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा घटनांमध्ये घाबरून न जाता त्वरित सर्पतज्ज्ञांना संपर्क साधावा आणि सापांना न मारता त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यास मदत करावी.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींची धास्ती वाढली ! ‘या’ लाभार्थ्यांवर दाखल होऊ लागले गुन्हे
शरद पवारांना धक्का ‘बडा नेता’ अजित पवार गटात करणार प्रवेश
क्षणात होत्याचं नव्हतं झालं, 200 फूट दरीत कोसळली खासगी बस, 5 भाविकांचा मृत्यू