इतिहासकार कवट्या महाकाल ऐशा नरा, मोजूनी माराव्या

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे ऊर्जा स्रोत आहेत, प्रेरणा स्रोत आहेत, असीम शौर्याचे प्रतीक आहेत. ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत. पण काही नतदृष्ट मंडळी जणू काही आपण इतिहासकार आहोत, इतिहासाचे(Historian) संशोधक आहोत अशा अविर्भावात इतिहासातील काही जाज्वल्य घटनांशी छेडछाड करतात आणि सामाजिक वातावरण दूषित करतात.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काही गरळ ओकली आहे. लोकांनी संतप्त व्हावे असे बेताल वक्तव्य केले आहे. ” ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा”अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाही तरच नवल!

राहुल सोलापूरकर हे सध्या मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर दिसत नाहीत. चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमध्ये काम मिळत नाही म्हणून सध्या ते एका आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनासाठी मॉडेलिंग करताना दिसतात. फार पूर्वी त्यांनी राजर्षी शाहू मालिकेमध्ये शीर्षक भूमिका केली होती. महेश कोठारे यांच्या एक दोन चित्रपटातही ते दिसले होते. त्यांची “कवट्या महाकाल”ही खलनायकाची भूमिका गाजली होती. म्हणूनच की काय कवटी सटकल्यासारखे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बरळले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज(Historian) यांनी कौशल्य दाखवून, बुद्धी चातुर्याने आग्रा येथून औरंगजेबाच्या नजर कैदेतून, कोठाडीतून पुत्र संभाजी यांच्यासह स्वतःची सुटका करून घेतली होती. आग्रा येथून सुटल्यानंतर ते स्वराज्यात कसे परतले, त्यांचा परतीचा प्रवास किती दिवसांचा होता, याचे सविस्तर वर्णन महाराष्ट्रातील इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी काही पुरावेही दिले आहेत. परतीच्या प्रवासात त्यांनी एकच घोडा वापरला नाही, तर ते दर काही अंतरावर घोडा बदलत असत. घोड्याची दमछाक होऊ नये म्हणून ते घोडे बदलत असत.

आग्र्याहून सुटका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट शौर्याचा इतिहास आहे. तथापि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका होण्यासाठी तेथील वजीरासह काहीजणांना लाच दिली होती. त्यांच्याकडून मुलुख सोडण्याचा परवाना त्यांनी लाच देऊन घेतला होता. असे वक्तव्य कुठल्यातरी मुलाखतीत त्यांनी केले आहे.
त्यांचे हे वक्तव्य प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.

राजकीय पक्षांनी तर त्यांच्या प्रतिमेला पैजारा मारून निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्यानंतरही ते आपल्या वक्तव्याशी ठाम आहेत. कोणतेही निमित्त नसताना, कोणतेही कारण नसताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचा सर्व थरातून निषेध झाला पाहिजे. त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे.

राहुल सोलापूरकर हे काही इतिहासकार नाहीत, इतिहास संशोधक नाहीत, जाणत्या इतिहास संशोधकांनी आग्र्याहून सुटका याविषयी सादर केलेले पुरावे बेदखल केले जावेत इतके भक्कम पुरावे त्यांच्याकडे नाहीत. आणि तरीही इतिहासाची आपण जणू काही नवीन मांडणी करत आहोत अशा थाटात त्यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल बेताल वक्तव्य केलेले दिसते.

वास्तविक कोणत्याही महापुरुषाविषयी(Historian) बेताल वक्तव्य करणाऱ्या मंडळींना प्रसार माध्यमांनी अनुल्लेखाने
मारले पाहिजे. आपल्या वक्तव्याची कोणीही गांभीर्याने दखल घेत नाही हे समजून आल्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य पुन्हा करण्याचे धाडस अशा मंडळींना होणार नाही. इतिहास पुरुषांविषयी काहीतरी बरळले, तर माध्यमे त्याची दखल घेतात आणि त्यामुळे फुकट प्रसिद्धी मिळते अशी धारणा बाळगणाऱ्यांच्या कडे सर्वांनीच दुर्लक्ष केले पाहिजे.

राहुल सोलापूरकर यांचा आता निषेध करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महान बनले अशा आश्रयाचे विधान केले होते. आणि त्याबद्दल त्यांनी लोकांची साधी माफीही मागितलेली नव्हती. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह या देशातील महापुरुषांची कुणी बदनामी केली तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा विना विलंब झाली पाहिजे अशी एक व्यवस्था शासनाने प्रस्थापित केली पाहिजे, तरच अशा महापुरुषांची बदनामी करण्याचे धाडस कोणीही करणार नाही.

हेही वाचा :

बाबा रामदेव यांना न्यायालयाचा सर्वात मोठा झटका!

‘सिंग इज ब्लिंग’ फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई?, ‘ते’ फोटो तूफान व्हायरल

“आता लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज…”; बच्चू कडूंचा प्रहार