ट्रम्प तात्यांची दादागिरी!

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना ते बेकायदेशीर रित्या अमेरिकेत आलेले आहेत असा ठपका ठेवून त्यांना अमेरिकन लष्कराच्या एका विमानाने भारतात परत पाठवले. या भारतीयांची पाठवणी करताना ट्रम्प(Trump) प्रशासनाने जो व्यवहार केला त्याबद्दल भारतात संतापाची लाट उसळणे क्रमप्राप्त होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प(Trump) तात्यांना खास मित्र समजत असताना या मित्राकडून भारतीयांशी केलेली वर्तणूक ही निषेध व्यक्त करावा अशी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची मोठी अडचण इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर परखड टीका करून केलेली आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुक प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी व्यक्तींना शोधून काढून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवणार असल्याचे सांगितले होते आणि त्यासाठी आपण अध्यक्ष झालो तर 64 दशलक्ष कोटी डॉलर खर्चाची घुसखोर हटाव मोहीम हाती घेणार असल्याचे सांगितले होते. आणि ही मोहीम त्यांनी प्राधान्य क्रमात पहिल्या क्रमांकावर घेतली होती. राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी बरेच काही निर्णय घेतले आणि त्यापैकी काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेतच पण त्यांचे काही निर्णय विस्तारवादी आहेत.

सुरुवातीला त्यांनी भारतासह चीन, कॅनडा, कोलंबिया वगैरे देशांच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर आयात कर वाढवला होता. चीनने अमेरिकेच्या वस्तूवर 15 टक्के जागा आयात कर लावून डोनाल्ड ट्रम्प यांना जशास तसे उत्तर दिले आहे.
भारतावर लावलेला आयात कर त्यांनी स्थगित केला असला तरी, भारताने विशेषता नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला आणि मलाही गृहीत धरू नये असा संदेश ट्रम्प तात्यांनी दिलेला दिसतो.

अमेरिकेतील काही स्थलांतरित भारतीय नागरिकांना शोधून काढून त्यांना लष्करी विमानात दाटीवाटीने बसवून तसेच 106 पैकी बहुतांशी भारतीयांच्या पायात बेड्या लावण्यात आल्या होत्या. अमृतसर विमानतळावर अमेरिकेचे हे लष्करी विमान लँड झाले आणि विमानातून भारतीय लोक बाहेर पडले तेव्हा त्यांच्या पायातील बेड्या विमानतळावर उतरल्यानंतर काढण्यात आल्या. त्यातून अमेरिकेला त्यासाठी काय संदेश द्यावयाचा होता हे कळायला मार्ग नाही.

भारतीय स्थलांतरितांना त्यांच्या पायात बेड्या घालून मायदेशी पाठवल्यानंतर इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित केला आणि अमेरिकेच्या या कृत्याचा निषेध केलाच शिवाय नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले. आणि मोदी आणि ट्रम्प यांच्यातील मैत्री विषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले.

डोनाल्ड ट्रम्प हे तुमचे मित्र आहेत तर मग त्यांनी भारतीय लोकांशी असा व्यवहार का केला? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. वास्तविक कोणत्याही देशाचे लष्करी विमान लँड करायला त्या देशाची परवानगी लागते.
कोलंबीयाने अमेरिकेच्या लष्करी विमानाला त्यांच्या भूमीवर उतरायला परवानगी नाकारली. त्यामुळे हे लष्करी विमान माघारी परतले. त्यानंतर कोलंबीयाने स्वतःचे विमान अमेरिकेला पाठवून तेथील स्थलांतरितांना मायदेशी आणले. अशीच कृती खरंतर भारताने करायला हवी होती.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जो खुलासा केलेला आहे तो कोणत्याही भारतीयाला पटणारा नाही. संसदेत आणि देशभरातून अमेरिकेच्या या कृत्याचा निषेध झाल्यानंतर भारताने अमेरिकेला भारतीय स्थलांतरीताविषयी, सन्मान योजना वागणूक देण्याचे आवाहन केले आहे. खरे तर नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या प्रशासनाला खडसावून जाब विचारणे आवश्यक होते.

बायोडेन यांच्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. तेव्हाही त्यांनी परदेशस्थ भारतीयांना तसेच अन्य देशातील तरुणांना नोकरीत प्राधान्य देऊ नये असा आदेशच काढला होता. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकन तरुणांना कंपन्यांनी किती पगार दिला पाहिजे याचे आदेशच त्यांनी काढले होते.

त्यामुळे तुलनेने स्वस्त असलेल्या भारतीयांच्या रोजगाराच्या संधी गमावल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष पदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये ट्रम्प यांनी विस्तारवादी भूमिका घेतलेली दिसते. विशेषता गाझापट्टीवर त्यांचा डोळा आहे. गाझा पट्टीतील पेलिस्टियन लोकांना जॉर्डन किंवा इजिप्त देशांने आश्रय द्यावा. त्यावेळेस त्यांनी नागरिक तिथून गेल्यानंतर, अमेरिका हे माझा पट्टीचा सर्वांकष विकास करेल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अर्थात इस्लामिक राष्ट्रांनी तातडीने त्याचा निषेध केला आहे.

हेही वाचा :

सॅमसनची बाजू घेतल्याने श्रीसंतच्या अडचणीत वाढ, केसीएने पाठवली नोटीस

DeepSeek चा वापर केल्यास होणार 20 वर्षांचा तुरुंगवास! 

‘चौथी मुंबई’ अस्तित्वात येणार, पण कुठे? वाचा सविस्तर