प्रशांत कोरटकर याचा पहिला अंक समाप्त…!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी गरळ ओकल्यानंतर गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या प्रशांत कोरटकरला सोमवारी अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला कोल्हापूरच्याप्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर(court) अभूतपूर्व पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. त्यामुळे गेला महिनाभर तापत राहिलेल्या कोरटकर प्रकरणाचा पहिला अंक आता समाप्त झाला आहे.

तपासाचा दुसरा अंकही संपल्यावर हा विषय बाजूला पडेल. कारण तोपर्यंत औरंग्याच्या विषयावरील दुसऱ्याच मुद्द्यावर पहिला अंक सुरू होईल. काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांनी त्याची सुरुवातही केली आहे.

प्रशांत कोरटकर याने ज्या मोबाईल वरून गरळ ओकली, इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली तो मोबाईल, त्या मोबाईल वरील आवाजाचे पृथक्करण किंवा आवाज कोणाचा? त्याचा तपास होईल. मोबाईल मधील कोणता डाटा डिलीट केला? आणि तो पुरावा असेल तर तो नष्ट करण्याचा प्रयत्न का झाला? हाच तपासाचा केंद्रबिंदू असणार आहे. माझ्या आवाजाची नक्कल करून दुसऱ्याच कुणीतरी छत्रपती घराण्याविषयी गरळ ओकली आहे असा प्रशांत कोरटकर चा दावा आहे. त्याची चिकित्सा आता होईल. पण तो निरापराध होता तर पोलिसांत काय हजर झाला नाही याचे समाधानाकारक स्पष्टीकरण त्याला आता द्यावे लागेल.

न्यायालयाने(court) कोरटकर याला फरारी घोषित केलेले नाही आणि नव्हते. त्यामुळे तो कोठे राहिला? त्याला मदत कोणी केली? याचा तपास किंवा रुजूवात घालण्याचा प्रश्न येत नाही. त्याच्याकडे दहा कोटी रुपये किमतीची रोल्स राईस ही कार कोठून आली? याचा तपास आय कर विभागाला स्वतंत्रपणे करावयाचा आहे पण त्यांची एन्ट्री अद्याप या प्रकरणात झालेली नाही. कोरटकर याचा पासपोर्ट त्याच्या पत्नीने जुना राजवाडा पोलिसांना दिल्यानंतरही पासपोर्ट शिवाय परदेशात जाता येत नाही पण तरीही तो परदेशी पळून गेल्याच्या बातम्या मीडियातून दिल्या गेल्या.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंद्रजीत सावंत यांनी प्रशांत कोरटकर हा मोबाईल वरून जो काही बरळला त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केली. कोरटकर विरोधात तो एक चिल्लर माणूस आहे म्हणून त्यांनी राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही. सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी ऑनलाइन फिर्याद दिली.

तेव्हाच कोरटकर हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला असता तर हे प्रकरण आजच्या इतके तेव्हा तापले नसते.
प्रशांत कोरटकर हा कधी नागपूर तर कधी चंद्रपूर असा प्रवास करत राहिला. अखेर तो सोमवारी तेलंगणामध्ये कोल्हापूर पोलिसांना सापडला. गेल्या महिन्याभरात कोरटकर याच्या विरोधात कोल्हापूर सह अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळली होती. त्याच्या विरोधात आंदोलने केली जात होती. तो का सापडत नाही याबद्दल गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलीस प्रशासनाला धारेवर धरले जात होते. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे, संघाचे मुख्यालय नागपूरला, आणि तथाकथित पत्रकार असलेला प्रशांत कोरटकर हा सुद्धा नागपूरचा. त्यामुळे त्याला वाचवले जात असल्याचा ठपका आंदोलकांनी ठेवला होता.

प्रशांत कोरटकर याला रीतसर अटक केल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात नेताना पोलिसांनी अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कारण त्याच्या विरुद्ध संतापाची लाट उसळलेली होती आणि त्याला चप्पल मारो आंदोलन केले जाणार होते, कोल्हापुरी चप्पल दाखवून त्याला हिसका दाखवला जाणार होता आणि म्हणूनच पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. जुना राजवाडा पोलीस ठाणे परिसर आणि न्यायालय(court) परिसर येथे पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

सरकारी वकील तसेच इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकर याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून जोरदार युक्तिवाद केला होता तर प्रशांत कोरटकर याचे वकील घाग यांनी ज्या गुन्ह्यात सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्याची गरज नाही आणि नव्हती. पोलीस तपासात प्रशांत कोरटकर हे सहकार्य करतील त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची गरज नाही असा युक्तिवाद केला होता. न्यायालयाने(court) दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. त्यामुळे प्रशांत कोरटकर प्रकरणाचा पहिला अंक आता समाप्त झालेला आहे असे म्हणता येईल.

हेही वाचा :

इचलकरंजी : माजी नगरसेवकासह तिघांना खंडणी प्रकरणी अटक

मोठी बातमी! आता ट्रक, ट्रॅव्हल्सवर मराठीतच संदेश, परिवहन मंत्र्यांचा आदेश; गुढीपाडव्याचा मुहूर्त..

ठाकरे गटाला मोठं खिंडार, ‘या’ बड्या नेत्यांचा आज शिंदेसेनेत पक्षप्रवेश