एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे(ST) जवळपास ८७ हजार कर्मचारी मार्च महिन्याच्या पगारापैकी फक्त ५६ टक्के रक्कम मिळाल्यामुळे नाराज होते. अपुऱ्या निधीमुळे उर्वरित रक्कम दिली गेली नव्हती. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्यानंतर अर्थ विभागाशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. आता येत्या मंगळवारपर्यंत शिल्लक ४४ टक्के रक्कम सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

महामंडळाने शासनाकडे मार्च महिन्याच्या पगारासाठी एकूण १,०७५ कोटी रुपये प्रतिपूर्ती रकमेचा प्रस्ताव सादर केला होता. मार्च महिन्यात शासनाकडून २७२.९६ कोटी रुपये निधी मिळाला, त्यातील काही रक्कम बँक कर्ज आणि पीएफसाठी वापरण्यात आल्याने केवळ १३५ कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी उरले. वेतनासाठी दरमहा सुमारे २५० कोटी रुपये आवश्यक असतात. परिणामी, कर्मचाऱ्यांना केवळ अर्धवट वेतन मिळालं.

महाराष्ट्र एसटी(ST) कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शासनाच्या अर्थखात्यावर टीका करत १० दिवसांत पूर्ण वेतन न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तसेच, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनीही संपूर्ण वेतन दिलं नाही, तर आंदोलन होईल असे स्पष्टपणे सांगितले होते.

मुंबई सेंट्रल आगारातील एसटी चालक अरविंद निकम यांनी, निम्मा पगार मिळाल्यामुळे कर्जाचे हप्ते भरल्यानंतर घरखर्च कसा चालवायचा असा सवाल उपस्थित केला. तर दीपक जगदाळे या दुसऱ्या कर्मचाऱ्याने सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ताही मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. घरकर्ज, शाळेची फी, आणि जीवनावश्यक खर्च यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :

मांजरीला वाचवत होता व्यक्ती, तितक्यात समोरून आला ट्रक अन्… क्षणातच गेला जीव; Video Viral

इचलकरंजीत गुन्हेगारीचा पर्दाफाश; जर्मनी गँगचा म्होरक्या पोलिसांच्या ताब्यात

मासिक पाळी आल्याची शिक्षा, वर्गाबाहेर काढलं; पायऱ्यांवर बसून विद्यार्थिनीने दिली परीक्षा