दिवाळीआधीच ‘या’ बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात

खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने(Bank) बचत खाते असलेल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने पाच लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर १७ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाले आहेत. बँकेने सादर केलेल्या नव्या ब्रॅकेटमध्ये ही व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

कोटक महिंद्रा बँकेने(Bank) एक नवीन ब्रॅकेट सादर केले आहे. या अंतर्गत पाच लाख रुपयांपेक्षा कमी बचत खात्यांवरील व्याजदरात ५० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. व्याजदर ३.५ टक्क्यांवरून, ३ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी बँकेच्या बचत खात्याचे दोनच स्लॅब होते. पहिल्या स्लॅबमध्ये ५० लाख रुपयांपेक्षा कमी ठेवींवर ३.५ टक्के आणि ५० लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर ४ टक्के व्याज दर होता.

मात्र, आता बँकेने तीन स्लॅब तयार केले आहेत. त्यातील एक स्लॅब पाच लाख रुपयांपेक्षा कमी रकमेचा आहे. त्याचा व्याजदर वार्षिक ३ टक्के आहे. तर ५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर ३.५ टक्के व्याज दर आहे. त्यानंतर ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर ४ टक्के व्याज दर मिळतो.

कोटक महिंद्रा बँकेने एफडीच्या व्याजदरात बदल केलेला नाही. बँक सामान्य नागरिकांसाठी २.७५ टक्के ते ७.४० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.२५ ते ७.९० टक्के व्याज देत आहे. हे दर १४ जून २०२४ पासून लागू आहेत.

दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेने स्टँडर्ड चार्टर्ड बँक इंडियाचे पर्सनल लोन बुक विकत घेण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सुमारे ४,१०० कोटी रुपयांच्या (सुमारे ४९० मिलियन डॉलर्स) थकित कर्जाचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही कर्जे स्टँडर्ड लोनच्या श्रेणीत येतात. प्रस्तावित व्यवहार ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा:

‘आता सुट्टी नाही’; यादी जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याची मोठी घोषणा!

राज्य सरकारने थांबवली मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना;काय आहे कारण?

अभिजात मराठी असलेल्या महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात हिंदी विषय सक्तीचा?