कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एकतर्फी प्रेम प्रकरणातून(love stories) तर कधी प्रेयसीने अचानक पाठ फिरवल्यामुळे तरुणींचे, अल्पवयीन मुलींचे खून होण्याचे प्रकार सुरूच आहेत. पोलीस प्रशासन त्याला पूर्णपणे जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही. पण कधी कधी संभाव्य धोक्याची पूर्व कल्पना पोलिसांना देऊनही पोलिसांचे तिकडे दुर्लक्ष होते आणि एखाद्या तरुणीचा खून होतो. नालासोपारा येथे मंगळवारी भर दिवसा आरती यादव या तरुणीचा रोहित यादव या तरुणाने जाड जोड लोखंडी पान्याचे(प्लंबर वापरतात तो) घाव घालून अमानुष खून केला.
या खुणाला(love stories) काही अंशी स्थानिक पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचे सक्रोच दर्शनी दिसून येते. आरतीचा खून होताना शेकडो लोकांनी सुरक्षित अंतर राखून पाहिले. काहींनी हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. एकाच वेळी पंधरा-वीस जणांनी एकत्र येऊन रोहित वर हल्ला केला असता तर तो पळून गेला असता आणि आरतीचा जीव वाचला असता, पण दुर्दैवाने तसे घडले नाही.
पान्याच्या एका घावात आरती खाली कोसळल्यानंतरही रोहित यादव हा तिला “तुने मेरे साथ ऐसा क्यू किया” असा सवाल करून तिच्यावर पान्याचे घालतच होता. एका तरुणांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी इतर बघ्यांनी त्या तरुणाला साथ दिली असती आणि एकत्र येऊन रोहितवर चाल केली असती तर तो पळून गेला असता आणि आरतीचा जीव वाचला असता. पण जेव्हा अशी थरारक घटना घडत असते तेव्हा बघ्यांच्या जबाबदारीची विभागणी होत असते.
आपण कशाला पुढे जायचे, दुसरा जाईल किंवा तिसऱ्यानेच तिला वाचवण्यासाठी पुढे जावे अशी मानसिकता प्रत्येकाची तेव्हा असते. परिणामी कुणीच पुढे जात नाही. घडलेल्या घटनांचे मोबाईल कॅमेऱ्यातून व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या पैकी कोणा एकालाही पोलीस कंट्रोल रूमला फोन करावा असे वाटले नाही. आपण पोलिसांना फोन केला तर पोलीस आपणाला त्रास देतील या विचाराने कुणी फोन केला नसेल तर सामान्य जनतेचा पोलिसांवरचा विश्वास राहिलेला नाही असे म्हणावे लागेल.
आरती यादव हिने रोहित यादव ला फटकारल्यानंतर किंवा त्याच्याशी ब्रेकप घेतल्यानंतर तो तिला सतत त्रास देत होता. त्याबद्दल तिच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रारही दाखल केली होती पण पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्याच्यावर अर्थात रोहित यादव याच्यावर प्रचलित कायद्याचा वापर करून (कलम 151 अन्वये), त्याला पॉलिसी हिसका दाखवला असता तर कदाचित तो सुता सारखा सरळ ही झाला असता.त्याच्या आई-वडिलांनाही पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन तुमच्या मुलाच्या हातून काही गंभीर घडू शकते असा इशारा दिला असता तरी त्याचे चांगले परिणाम दिसून आले असते.
पिंपरी चिंचवड येथून पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झालेले आर के पद्मनाभन हे वीस वर्षांपूर्वी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक होते. त्यांनी पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची अतिशय गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, प्रत्येक तक्रारीची अदखलपात्र गुन्हा म्हणून दखल घेतली पाहिजे असा त्यांनी फतवा काढला होता. दाखल केलेल्या एका अ दखलपात्र गुन्ह्यामुळे संभाव्य गंभीर गुन्हा रोखता येऊ शकतो. त्यातून एखाद्याचा जीव वाचू शकतो.
यावर आर के पद्मनाभन यांचा विश्वास होता, म्हणून त्यांनी हा फतवा काढला होता. विशेष म्हणजे त्याचे चांगले परिणाम दिसून आले. नालासोपारा पोलिसांनी अशाच प्रकारे गांभीर्याने दखल घेतली असती तर आरती यादव या तरुणीचा जीव वाचला असता.
दाखल झालेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्याची पोलीस प्रशासनाने खातेनिहाय चौकशी केली पाहिजे. तरच दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती कमी होईल. “अगर तुम और कि होगी, तो मुश्किल होगी”हे अनाडी चित्रपटातील गाणे ऐकायला गोड वाटते पण त्यात एक धमकी सुद्धा आहे याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते. सध्या तर तू माझ्याशिवाय इतर कोणाची झालीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशा प्रकारची मानसिकता काही विकृत तरुणांच्या मध्ये तयार होते आहे. ठाण्यामध्येच सुमारे 30 वर्षांपूर्वी रिंकू पाटील या इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनीची तिच्या वर्गामध्ये शिरून एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले होते. एकतर्फी प्रेमातून घडलेली महाराष्ट्रातील ती पहिली घटना होती. या घटनेने तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
रिंकू पाटील हिच्या नंतर सांगली शहरात अमृता देशपांडे हिचा अशाच पद्धतीने एकतर्फी प्रेमातून(love stories) कृष्णा नदीच्या घाटावर एका विकृत तरुणाने खून केला होता. हे प्रकरणही संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देऊन गेले होते. दुर्दैवाने हा गुन्हा सांगली पोलीस न्यायालयात सिद्ध करू शकले नाहीत. मराठवाडा आणि विदर्भ येथे काही जिल्ह्यात असे एकतर्फी प्रेमातून खुनाचे प्रकार घडले होते. अगदी काही महिन्यापूर्वी पुणे शहरातील एका उपनगरात एका तरुणीवर भर रस्त्यात एका विकृत तरुणाने कोयत्यांने हल्ला केला होता.
पण काही धाडसी तरुणांनी त्या तरुणाला पळवून लावले होते. गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळलेल्या त्यात तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचा जीव वाचला. तिथेही लोकांनी बघायची भूमिका घेतली असती तर तिचाही जीव गेला असता.
भर दिवसा भर रस्त्यावर अशा प्रकारचा प्राणहतक हल्ला होत असताना, आपल्या मोबाईल मधून पोलीस कंट्रोल रूमला फोन न करता घडलेल्या प्रसंगाचे मोबाईल कॅमेऱ्यातून कोणी व्हिडिओ शूटिंग करत असेल तर त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे. थरारक घटनांचे मोबाईल माध्यमातून व्हिडिओ शूटिंग करण्याची मानसिकता अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.
कुणीतरी दुसरा फोन करेल असा विचार करून कोणीच फोन करत नाही. त्यामुळे अशा घटना घडतात. घटना बघणार्यांनी घटना टाळण्यासाठी आपली सामूहिक जबाबदारी आहे या कर्तव्याची जाण ठेवून एकत्रित प्रतिबंध केला तर एखाद्या तरुणीचा जीव वाचू शकतो. अन्यथा रिंकू पाटील ते आरती यादव आणि आरती यादव ते आणखी कुणीतरी असा रक्तरंजित प्रवास सुरूच राहील.
हेही वाचा :
कोल्हापुरात महायुतीला मोठा धक्का? माजी आमदार अजितदादांची साथ सोडणार
सांगलीच्या मुरलीधर पेटकर यांच्या ‘चंदू चँपियन’ची कहाणी प्रेक्षकांना भावली
“जरांगेंचे समाधान होतच नाही…” सगेसोयऱ्यांबाबत बोलताना असं का म्हणाले गिरीश महाजन