मुलाच्या वाढदिवसाची तयारी करताना इमारतीत लागली आग; पुढे जे घडलं…

पुणे : कोंढवा भागात तीन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसाची तयारी करताना इमारतीच्या(building) तळमजल्यावर अचानक आग लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. इमारतीमधून धूर येऊ लागल्यानंतर आगीची घटना समोर आली. तत्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्या चिमुकल्यासह पाच महिलांची सुटका केली. कोंढवा येथील भाग्योदयनगर परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

कोंढवा भागात भागोदयनगर परिसरात गल्ली क्रमांक ३४ मधील तीन मजली इमारत(building) आहे. खाली कपड्यांचे दुकान आहे. तर, पहिल्या व दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर नागरिक राहतात. दरम्यान, एका तीन वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाची तयारी कुटूंब करत होते. तेव्हा अचानक दुपारी पावणेतीनच्या समारास तळमजल्यावरील दुकानात आग लागली. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने धूर मोठ्या प्रमाणात येऊ लागला.

नागरिकांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. लागलीच अग्निशमन दलाचे जवान फायर बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा तळमजल्यावरील कपड्यांच्या दोन दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे लक्षात आले. तर, इमारतीतील चिमुकल्यासह पाच महिलांना धुरामुळे बाहेर पडता येत नव्हते.

जवानांनी प्रसंगावधान राखून पाण्याचा मारा सुरू केला. आग इमारतीत पसरणार नाही, याची काळजी घेत जवानांनी श्वसन यंत्र परिधान करुन घरात अडकलेल्या चिमुकल्यासह पाच महिलांची सुटका केली. आगीत कपडे, लाकडी साहित्य, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री जळाली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. आगीत एका महिलेसह अग्निशमन दलाच्या जवानाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळल्याने रहिवाशांनी कौतुक केले. अग्निशमन दलातील वाहनचालक रवींद्र हिवरकर, सत्यम चौखंडे, रफिक शेख, किशोर मोहिते, योगेश पिसाळ, सागर दळवी, निलेश वानखेडे, कुणाल खोडे, गोविंद गिते, हर्षल येवले, हर्षवर्धन खाडे यांनी ही कामगिरी केली.

पुण्यात आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या काही दिवसाखाली हडपसर भागातील वैदुवाडी येथे एका भंगार मालाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत गोडाऊन जळून खाक झाले आहे. पाण्याचा मारा करून काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण समजू शकले नाही.

हेही वाचा :

रोहित शर्मा निवृत्त होणार? तिसऱ्या कसोटीत OUT होताच दिले संकेत

वाहतुकीचे नियम मोडणं रॅपर बादशहाला पडलं महागात, भरावा लागला ‘इतका’ दंड

“मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती पण,…”; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट