कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : वसंत दादा पाटील यांनी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण केले. त्यातून महाराष्ट्रात अनेक खाजगी शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या. या शिक्षण संस्था बहुतांशी राजकारण्यांच्या हातात आहेत. या राजकारणी मंडळींनी या शिक्षण (education)संस्थांची चक्क दुकानदारी केली.

शिक्षण(education) संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अनेक संस्थाचालक गुलामासारखी वागणूक देतात. या गुलामगिरीला कंटाळून धनंजय नागरगोजे या नावाच्या शिक्षकाने स्वतःला फासावर लटकावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेली सुसाईड नोट, प्रत्येक संवेदनशील व्यक्तीचे हृदय पिळवटून टाकणारी आहे. विशेष म्हणजे इथल्या मुर्दाड व्यवस्थेने या घटनेची दखल गांभीर्याने घेतलेली नाही.
गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा गाजतो आहे. या जिल्ह्यातील केज, परळी, मसाजोग, आणि आष्टी ही गावे विशेष चर्चेत आहेत. सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचे आमदार याच आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. याच तालुक्यात एक शिक्षण(education) संस्था आहे. या संस्थेचे बहुतांशी संचालक हे ओबीसी समाजाचे आहेत. याच संस्थेच्या एका शाळेत धनंजय नागरगोजे हे शिक्षक म्हणून काम करत होते. गेली अठरा वर्षे ते विना वेतन काम करत होते.
आता येथून पुढे मला विना वेतन काम करता येणार नाही. तेव्हा मला वेतन मिळावे अशी काही व्यवस्था करा अशी विनंती त्यांनी संस्था चालकांना केली होती. या संस्थेचे मुंडे नामक संचालक आहेत. त्यांनी धनंजय नागरगोजे यांना
“तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा होशील आणि तू मेल्यानंतर दुसरा शिक्षक नेमायला मी मोकळा होईन”
असा अजब सल्ला दिला. त्यामुळे कमालीचे नैराश्य आलेल्या नागरगोजे यांनी आपल्या घरातच फास लावून घेऊन आत्महत्या केली.
या शाळेत शिक्षक म्हणून काम करताना संस्थेतील ज्या संचालकांनी त्रास दिला, छळ केला, विना वेतन राबवून घेतले त्यांची नावे सुसाईड नोटमध्ये समाविष्ट करून नागरगोजे यांनी तीन पानी चिट्ठी दिली आहे. ती त्यांनी आपल्या लहान मुलीला उद्देशून लिहिलेली आहे. त्यातील मजकूर वाचल्यानंतर कोणाही संवेदनशील माणसाचे हृदय पिळवटून गेल्याशिवाय राहणार नाही.
नागरगोजे यांनी आत्महत्या करून आठ दिवस उठून गेले आहेत आणि पोलिसांनी आतापर्यंत गुन्हाही दाखल करून घेतलेला नाही. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होईल असे समजायला हरकत नाही.
पण धनंजय नागरगोजे ही एकमेव व्यक्ती नाही. असे अनेक नागरगोजे महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये आहेत. शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करायची. त्यांना काही वर्षे विना वेतन राबवून घ्यायचे. नंतर या शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शासन दरबारी अप्रुव्हल घ्यायचे. या शिक्षक व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका तयार झाल्यानंतर संबंधितांचा पगार ते काम करीत असलेल्या महिन्यापासून दिला जातो. ही रक्कम काही लाखात असते.
हे पैसे संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बँक अकाउंट वर जमा होतात. पण त्यापूर्वीच संस्थाचालक संबंधिताच्याकडून सही असलेले कोरे धनादेश घेतात. त्यावर अमाऊंट टाकून शिक्षकाच्या बँक अकाउंट वरील रक्कम काढून घेतात. साधारणतः 50 टक्के पेक्षा अधिक रक्कम काढून घेतली जाते. याशिवाय काही कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली जाते. किंवा त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली जाते. अशा प्रकारची दुकानदारी महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये आजही चालू आहे. या शिक्षण संस्था बहुतांशी राजकीय नेत्यांच्या ताब्यात असतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार करून काहीही उपयोग होत नाही. असे अनेक धनंजय नागरगोजे हा अन्याय सहन करून संस्थेमध्ये काम करत असतात.
शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण करण्यात आल्यानंतर कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित आणि अनुदानित असे तीन विभाग पाडण्यात आले आहेत. कायम विनाअनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण(education) संस्था या नंतर अंशतः अनुदानित केल्या जातात, वीस टक्के,चाळीस टक्के असे पाच टप्प्यात शाळा अनुदानित होते. शिक्षक व कर्मचाऱ्यांना फरकाचे रक्कम दिली जाते आणि या रकमेवरच संस्थाचालकांचा डोळा असतो.
धनंजय नागरगोजे हे काम करीत असलेली शिक्षण संस्था कायम विनाअनुदानित या प्रकारात नव्हती. ती अनुदानित होती. तथापि नागरगोजे यांना संस्थेने तब्बल 18 वर्षे विनावेतन ठेवले होते. हा त्यांच्यावरील मोठा अन्याय होता. पण या अन्यायाविरुद्ध ते लढू शकत नव्हते. माझे अप्रूव्हल करा. सेवा पुस्तिका करा, आणि मला वेतनश्रेणीमध्ये घ्या अशी विनंती ते संस्थाचलकांच्याकडे वारंवार करत होते. पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. शेवटी हतबल होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली.
मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी म्हणजे अनेक शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारे काम करणाऱ्या अनेक नागरगोजे नामक शिक्षकांची प्रातिनिधिक वेदना आहे. वास्तविक धनंजय नागरगोजे यांनी लिहिलेल्या मृत्यू पूर्वीच्या चिठ्ठीची दखल घेऊन पोलिसांनी संबंधित संस्थाचालकांच्या विरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. तथापि तो केला गेलेला नाही आणि म्हणूनच अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत हा विषय अवचित त्याचा मुद्दा उपस्थित करून मांडला. आता संबंधितांच्या विरुद्ध धनंजय नागरगोजे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल होईल.
हेही वाचा :
‘अमिताभ आणि रेखा यांच्यात…’, ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी उघड केलं सत्य, ‘रात्री घरी जाऊन…’
भाजपचा उद्धव ठाकरेंना दे धक्का, ‘या’ बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ
‘आम्हाला आमच्या टीमचा अभिमान आहे… ‘सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर NASAने व्यक्त केल्या भावना