वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती… आता इंजेक्शन घेण्यासाठी सुईची गरज नाही!

मुंबई : सुई टोचून घेण्याची भीती आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी सुईविरहित इंजेक्शनचे(injections) तंत्रज्ञान विकसित केले असून, यामुळे लस घेताना होणाऱ्या वेदनांपासून सुटका होणार आहे. हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणारे ठरणार आहे.

‘शॉक सिरिंज’ असे या नव्या उपकरणाचे नाव असून ते बॉलपेनपेक्षा किंचित लांब आहे. या सिरिंजचे वैशिष्ट्य म्हणजे यात सुईचा वापर केला जात नाही. या सिरिंजच्या माध्यमातून शॉक वेव्हच्या सहाय्याने औषध शरीरात टोचले जाते. हे तंत्रज्ञान २०२१ मध्ये प्रा. मेनेजेस यांच्या प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले असून, या संशोधनाबद्दलची माहिती ‘जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरियल्स अँड डिव्हायसेस’ या नियतकालिकात प्रकाशित झाली आहे.

या सिरिंजमुळे वेदनाविरहित इंजेक्शन(injections) देणे शक्य होणार आहे. यामुळे लहान मुले आणि मोठ्यांच्या लसीकरण मोहिमांना वेग येईल. तसेच, सुईची हाताळणी चुकीच्या पद्धतीने झाल्यास किंवा अयोग्य विल्हेवाट लावल्यास होणारे रक्तजन्य आजार टाळणे शक्य होईल.

या सिरिंजची कार्यक्षमता तपासण्यासाठी आयआयटीच्या संशोधकांनी तीन वेगवेगळ्या चाचण्या केल्या. यात तीन वेगवेगळ्या प्रकारची औषधे उंदरांमध्ये टोचण्यात आली. भूल देण्याच्या औषधाची परिणामकारकता नेहमीच्या इंजेक्शनप्रमाणेच आढळून आली. तसेच, अँटिफंगलसारख्या दाट औषधांचे वहन करण्यासही ही सिरिंज सक्षम असल्याचे दिसून आले.

या सिरिंजचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एकाच सिरिंजद्वारे १००० पेक्षा जास्त इंजेक्शन देणे शक्य आहे. यामुळे वैद्यकीय कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात घट होईल.

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे लसीकरणाची प्रक्रिया सुलभ आणि वेदनारहित होणार असून, त्याचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे.

हेही वाचा :

केवळ स्मार्टफोन आल्यामुळे डिजिटल अरेस्ट चे प्रकार वाढले

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात ट्विट करणं भोवलं, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

उद्याची सोमवती अमावस्या अनेकांचं नशीब बदलणार? ‘हे’ शुभ योग बनवणार मालामाल