अंबाबाईच्या दर्शनाआधी पंचगंगेत उतरले; पाण्यात उतरताच धाप लागली आणि… तरुणासोबत भयंकर घडलं

कोल्हापूर : सध्या सुट्टीचा हंगाम सुरू होत आहे. सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक(Tourist) कोल्हापुरात दाखल होऊन श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला येतात. यावेळी अनेक पर्यटक देवीच्या दर्शनाला जाण्याआधी पंचगंगा नदीत अंघोळ करतात. असाच एक तरुणांचा ग्रुप सुट्ट्यांमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आला होता.

७ ते ८ जणांचा ग्रुप देवीच्या दर्शनाला जाण्याआधी पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेला. यातील एका तरुणाचा पंचगंगा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. शंकर जालिंदर गवळीकर (वय ३२, रा. मिरकल, बिदर, कर्नाटक) असं मृत तरुणाचं नाव असून ही घटना रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी की, सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून शनिवारी जोतिबाची यात्रा देखील आहे. यासाठी अनेक भक्त आणि पर्यटक(Tourist) कोल्हापुरात दाखल होत आहेत. उन्हाळ्यात काहीसा थंडावा मिळावा यासाठी अनेक पर्यटक पंचगंगेत जातात. तसंच ज्योतिबाला जाताना पंचगंगेत स्नान करून जातात.

बिदर कर्नाटक येथे राहणारा शंकर हा त्याच्या आठ ते दहा मित्रांसोबत शनिवारी रात्री श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला निघाला होता. ते सर्व जण पहाटे कोल्हापुरात पोहोचले. दर्शनाला जाण्यापूर्वी ते पंचगंगा घाटावर अंघोळीसाठी आले. सर्वांनीच नदीत उड्या घेतल्या. मात्र यावेळी शंकरला पोहता येत नसल्याने पाण्यात उतरताच त्याला धाप लागू लागली, त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा जीव गुदमरू लागला. त्यानंतर हळूहळू खाली बुडू लागला.

शंकर नदीत बुडत असल्याचं त्याच्या मित्रांना कळताच मित्रांनी आरडाओरडा करून मदतीसाठी लोकांना बोलावलं. पण शंकर तोपर्यंत पाण्यात बुडाला होता. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस घाटावर दाखल झाले. उदय निंबाळकर यांनी पाण्यात उतरून तरुणाचा शोध सुरू केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास शंकरचा मृतदेह सापडला. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा :

शेअर बाजारानंतर केंद्र सरकारने जनतेला दिला धक्का! पेट्रोल अन् डिझेल महागणार?

महिलेने दरवाजा उघडताच Delivery बॉयने पँट काढली अन्…; धक्कादायक प्रकार

उन्हाळ्यात सतत एसीमध्ये बसल्यामुळे वाढतो मायग्रेनचा धोका