‘आमचं ठरलंय’नं पलटवली बाजी अन् बंटी पाटलांनी स्वतःच्या पराभवाचा काढला वचपा

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमदेवार खासदार धनंजय महाडिक यांना(flip website) पाठिंबा दिला. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत ‘दक्षिण’मध्ये पाटील यांच्याविरोधात महाडिक यांचे बंधू माजी आमदार अमल महाडिक यांनीच शड्डू ठोकला.

या निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला; पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत(flip website) पाटील यांनी नेत्यांचे आदेश डावलून महाडिक यांच्याविरोधात काम केले. त्यावेळी त्यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत घेतलेली भूमिका निवडणुकीतील ‘टर्निंग पॉईंट’ ठरली. ‘आमचं ठरलंय’ हा ब्रँड नंतर राज्यभर पोहोचला.

महाडिक-पाटील वाद खऱ्या अर्थाने पेटला तो २००९ पासून. २०१० मध्ये सतेज पाटील हे राज्यमंत्री झाले, त्यामुळे पक्षाची जबाबदारीही त्यांच्यावर होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली. आघाडीत कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला गेली आणि उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या धनंजय महाडिक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. मंत्री म्हणून असलेली जबाबदारी, वरिष्ठ नेत्यांचे आदेश आणि पक्षाची चौकट म्हणून पाटील यांनी महाडिक यांना पाठिंबा दिला; पण त्यानंतर सहा महिन्यांतच झालेल्या विधानसभेत महाडिक गटाकडून पाटील यांनाच ‘दक्षिण’मध्ये आव्हान देण्यात आले.

त्यांच्याविरोधात अमल महाडिक यांना रिंगणात उतरवले गेले. अवघ्या पंधरा दिवसांच्या अमल यांच्या उमेदवारीने पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. हा पराभव पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. २०१४ च्या विधानसभेतील पराभवानंतर पाटील हेच सावध झाले. त्यांनी या पराभवाचा पहिला बदला २०१६ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा पराभव करून घेतला. त्यानंतर संधी मिळेल तिथे पाटील यांनी महाडिक यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेनंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली. पुन्हा दोन्ही काँग्रेसची आघाडी होऊन ही जागा विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा असल्याने त्यांनाच मिळाली आणि उमदेवारीही महाडिक यांना मिळाली.

पण, २०१४ ते २०१९ या काळात महाडिक हे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर अपवादानेच दिसले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्या व्यतिरिक्त त्यांचा राष्ट्रवादीशी फारसा संपर्क राहिला नाही. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांसह नेत्यांतही नाराजी होती. अशातच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत त्यांनी थेट भाजप सदस्य असलेल्या वाहनाचे सारथ्य केले. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या नाराजीत वाढ झाली. महाडिक यांच्या २०१९ च्या पराभवाला पाटील यांच्या भूमिकेपेक्षा महाडिक पक्षापासून दुरावल्याचे कारणही महत्त्वाचे ठरले.

प्रत्यक्ष निवडणुकीत पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला; पण त्यांनी ‘आमचं ठरलंय’चा नारा देत महाडिक यांच्याविरोधात उघड भूमिका घेत त्यावेळचे महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. थेट कोणत्याही व्यासपीठावर न जाता पाटील यांनी सगळी ताकद महाडिक यांच्याविरोधात प्रा. मंडलिक यांच्या बाजूने लावली. त्यावेळी ‘आमचं ठरलंय’ हा नारा परवलीचा झाला होता. प्रत्येकाच्या तोंडात ‘आमचं ठरलंय’ हा एकच नारा होता. त्यातून महाडिक यांचा तब्बल दोन लाख ७० हजार मतांनी पराभव झाला.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अमल यांचा पराभव करतानाच पुतणे ऋतुराज पाटील यांना आमदार करून पाटील यांनी दक्षिणमधील स्वतःच्या पराभवाचा वचपा काढला. त्यानंतर ‘आमचं ठरलंय, आता ‘गोकुळ उरलंय’ म्हणत पाटील यांनी महाडिक यांच्याविरोधातही जिल्ह्यातील सर्व पक्षीयांना एकत्र करून ‘गोकुळ’ ही ताब्यात घेतले. पाटील-महाडिक वादात ‘आमचं ठरलंय’ हा नारा प्रभावी ठरला किंबहुना राज्यभर हा नारा पोहोचला. एखाद्या घोषणेवरून किंवा नारा देऊन निवडणुकीत काय होऊ शकते याची प्रचिती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते ‘गोकुळ’च्या निवडणुकीपर्यंत दिसली. किंबहुना हा नाराच ‘टर्निंग पॉईंट’ ठरला.

हेही वाचा :

..तर शौमिका महाडिक गप्प बसणार नाहीत, दिला इशारा

अजूनही वेळ गेलेली नाही, शाहू महाराजांनी फेरविचार करावा, मुश्रीफांनी पुन्हा डिवचले

पांड्यासाठी रोहित शर्माला जे जमलं नाही ते विराट कोहलीने केलं… उचललं हे मोठं पाऊल