अबिटकरांची हॅट्रिक होणार? कि, के.पी.बाजी मारणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यास कठीण असलेला मतदारसंघ(political) म्हणजे राधानगरी भुदरगड होय. राधानगरी, काळम्मावाडी या धरणांचा तसेच राधानगरी, दाजीपूर, पाटगाव हा जंगल परिसर, दुर्गम वाड्या, वस्त्या आणि गावे या मतदारसंघात आहेत. मौनी महाराजांच्या तसेच आदमापुरच्या बाळूमामाच्या वास्तव्याने पावन झालेली दोन ठिकाणी या मतदारसंघात येतात. राधानगरी आणि भुदरगड ही दोन्ही ठिकाणे ऐतिहासिक म्हणून ओळखली जातात.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सुरू असलेल्या आरोप आणि प्रत्यारोपामुळे हा मतदारसंघ (political)आजही विकासापासून वंचित असल्याचे स्पष्ट होते. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी इथे लढत होते आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने प्रकाश अबिटकर आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्यावतीने के पी पाटील हे निवडणूक आखाड्यात आहेत. एका उमेदवाराला येथे विजयाची हॅट्रिक करावयाची आहे तर दुसऱ्या एका उमेदवाराला पराभवाची परंपरा खंडित करावयाची आहे.

राधानगरी तालुक्यातील शंकर धोंडी पाटील, कृष्णाजी गंगाराम मोरे, नामदेवराव भोईटे तर भुदरगड तालुक्यातील दिनकरराव भाऊसाहेब जाधव, हरिभाऊ कडव, बजरंग देसाई, के पी पाटील, प्रकाश अबिटकर यांच्याकडे विधानसभेचे प्रतिनिधित्व आलेले आहे. अविभाजित शिवसेनेकडून प्रकाश अबिटकर दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत आणि आता ते एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. त्यांनी केलेला पक्ष बदल हा या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदाराला रुचलेला आहे का? या प्रश्नाचे उत्तर या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांच्या कडून मिळणार आहे.

के पी पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. दुभंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(political) ते शरद पवार यांच्याकडे होते की अजितदादा पवार यांच्याकडे? याबद्दल त्यांनी संभ्रम निर्माण केला होता. महायुतीचे तिकीट प्रकाश अबिटकर यांच्याकडे जाणार हे निश्चित झाल्यानंतर के पी पाटील यांनी शिवसेनेच्या उबाठा गटात प्रवेश करून महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभेचे रिंगण गाठले. त्यांनी दोन महिन्यात केलेले पक्ष बदल लोकांच्या चर्चेत होते. विद्यमान आमदार अबिटकर यांनी मतदारसंघाला दहा वर्षे मागे नेले. लोकांचे हक्काचे पाणी आज आम्ही सारख्या उद्योगपतीला विकले असे आरोप के पी पाटील यांच्याकडून करण्यात येत आहेत तर के पी यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात कंत्राटदार निर्माण केले. सामान्य माणसाचे कोणतेही भले केले नाही असा अबिटकर यांचा आरोप आहे.

काही महिन्यापूर्वी दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत मावळते आमदार प्रकाश अबिटकर यांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष के पी पाटील यांच्याविरुद्ध पॅनेल उभे केले होते. तथापि या निवडणुकीत आबिटकर यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. केपी यांनी कारखान्यावरची सत्ता कायम राखली. त्यानंतर आता हे दोघेजण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आखाड्यात कोणत्याही स्थितीत जिंकणारच, मैदान मारणारच असा निर्धार करून उतरले आहेत. केपी यांना पराभवाची परंपरा खंडित करावयाची आहे. पण ती सहज आणि सोपी नाही.

प्रकाश अबिटकर यांना विजयाची हॅट्रिक करावयाची आहे. शिवसेनेचे सुरेश साळुंखे, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजित आबा पाटील सरूडकर, डॉक्टर सुजित मिणचेकर, यांना तिसऱ्यांदा मतदारांनी नाकारले होते. त्यांना विजयाची हॅट्रिक करता आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश अबिटकर हे हॅट्रिक करण्यात यशस्वी होतील का? हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

प्रकाश अबिटकर हे सलग दहा वर्षे आमदार आहेत. यानिमित्ताने ते सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात आहेत. त्यांनी आपल्या या दुर्गम मतदार संघात रोजगाराच्या संधी किती निर्माण केल्या? दुर्गम गावे आणि वाड्या वस्त्यांवर किती प्रमाणात मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या? संपर्काची साधने किती निर्माण केली? दळणवळण व्यवस्था किती मजबूत केली? निधी किती आणला आणि त्यातून विकासकामे किती केली? यावर त्यांचे विजयाचे गणित सुटणार आहे. सध्या तरी या मतदारसंघात अबिटकर विरुद्ध केपी अशी अटीतटीची लढत दिसते आहे.

हेही वाचा :

राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा

गुगल मॅप युजर्ससाठी महत्त्वाची टीप! लोकेशन हिस्ट्री, सर्च रिजल्ट अशा पद्धतीने करा डिलीट