कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बदलापूर येथील दोनच चिमूरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाचा पोलिसांनी सोमवारी एन्काऊंटर(encounter) केला. त्याच्या विरुद्ध दीड दोन महिन्यापूर्वी देशभर संतापाची लाट उसळली होती. त्याचा एन्काऊंटर झाल्यानंतर बदलापूर मध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त केला जात असताना राजकारणी मंडळी मात्र त्याच्या एन्काऊंटर बद्दल अनेक प्रश्न आणि संशय निर्माण करत होती.
अक्षय शिंदे यांच्याकडे फार महत्त्वपूर्ण माहिती होती आणि ती लोकांच्या समोर येऊ नये म्हणून त्याचा एन्काऊंटर (encounter) करण्यात आला अशा प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केल्या आहेत. अक्षय शिंदे यांना फासावर लटकवला पाहिजे अशी तेव्हा मागणी करणारे राजकारणी आता मात्र हा कोल्ड ब्लडेड मर्डर आहे, सरकारी रिवाल्वर चा वापर करून त्याची हत्या करण्यात आली आहे असे म्हणताना दिसत आहेत.
चाळीस वर्षांपूर्वी सर्वसामान्य जनतेला एन्काऊंटर, गेम वगैरे शब्द माहित नव्हते. मुंबईचे पोलीस आयुक्त जे. एफ. रिबेरो होते. तेव्हा त्यांच्या काळात मुंबईत गॅंगवर भडकले होते. आणि ते थांबवण्यासाठी म्हणून एन्काऊंटर हा प्रकार पोलिसांनी शोधून काढला. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी विशेषणे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तेव्हा लावली जात होती. त्यापैकी दोन एन्काऊंटर स्पेशालिस्ट चक्क राजकारणात आले होते आणि आहेत. एन्काऊंटर चा सिलसिला मुंबईत सुरू झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते.
एन्काऊंटर(encounter) बद्दल मोठ्या प्रमाणावर संशय व्यक्त होऊ लागल्यानंतर प्रत्येक एन्काऊंटरची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्याचा शासन निर्णय झाला. तेव्हा प्रत्येक गुंडाला कायदेशीर प्रक्रिया राबवून शिक्षा झाली पाहिजे असे राज्यकर्ते म्हणताना दिसत नव्हते. शरद पवार यांनीही तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पोलीस त्यांचे काम करतात, त्यांना ते करू द्या असे शरद पवार तेव्हा म्हणत असत.
आता अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर बद्दल त्यांची भूमिका वेगळी दिसते. मुळातच प्रत्येक एन्काऊंटर हे संशयास्पद असते. मन्या सुर्वे पासून ते सावत्या मामा पर्यंतची सर्व एन्काऊंटर्स संशयास्पदच होती. पण कारवाई कुणावरच झाली नाही. दया नायक, सचिन वाझे, समशेर खान पठाण, इसाक बागवान, असलम मोमीन, पठाण यांना तर एन्काऊंटर फेम असे विरोध लावले जायचे.
या एकूण पार्श्वभूमीवर अक्षय शिंदे याचा पोलिसांनी वाजवलेला गेम हा काही प्रश्न निर्माण करतो. त्याला कायदेशीर प्रक्रिया राबवून तळोजा तुरुंगातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. देशभर गाजलेल्या अति संवेदनशील गुन्ह्यातील तो संशयित आरोपी आहे, त्यामुळे त्याला हातात बेड्या घालणे आवश्यक होते. बेड्या घातल्या असत्या तर त्याला पोलीस अधिकाऱ्याची रिवाल्वर हिसकावून घेता आली नसती. अक्षय शिंदे यांने अगदी सहजरीत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कमरेला कव्हर मध्ये असलेली रिवाल्वर काढून हातात घेतली आणि त्यातून तीन फायर केले.
यावर सामान्य माणसाचा विश्वास बसत नाही. ते रिवाल्वर लॉक होते की अनलॉक होते? चपराशी असलेल्या अक्षय शिंदे याला असे एखादे अग्नि शस्त्र चालवण्याचा अनुभव होता काय? असे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. पोलिसांचा तो हलगर्जीपणा होता की तो मुद्दाम ठरवून करण्यात आलेला होता याबद्दलही संशय आहे. पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या असे सांगितले जाते. आता त्याबद्दल आधीच्याच शासन निर्णयाप्रमाणे त्याची सखोल चौकशी केली जाईल. त्यातून पोलिसांचा हलगर्जीपणा सिद्ध झाला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
अक्षय शिंदे हा ज्या शिक्षण संस्थेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता ती आदर्श शिक्षण संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित आहे, आपटे, कोतवाल हे या शिक्षण संस्थेचे विश्वस्त आहेत. दोन चिमूरड्या मुलींवर अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना त्यांनी लपवून ठेवली हा त्यांच्याकडून घडलेला गुन्हा आहे आणि त्याबद्दल त्यांच्यावर पोक्सो कायद्याखाली पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे मात्र ते अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. हे वास्तव आहे. त्यांचा शोध घेण्यात तपास यंत्रणेला अपयश आले आहे असे सध्या तरी म्हणता येईल.
त्यांच्याबद्दल अक्षय शिंदे या नराधमाकडे काही महत्त्वाची माहिती आहे, आणि ही माहिती त्याच्याकडून बाहेर येऊ नये यासाठी त्याचा एन्काऊंटर करण्यात आला असा अप्रत्यक्षपणे आरोप महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून केला जातो आहे. शरद पवार,अनिल देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार या नेत्यांनी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर वर आक्षेप घेतला आहे. काहीतरी लपवून ठेवण्यासाठी, अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अक्षय शिंदे हा सध्या न्यायालयीन कोठडीत म्हणजे तळोजा कारागृहात होता. त्याला काहीतरी महत्त्वाचे सांगावयाचे असेल तर त्याला कोणतीही अडचण नव्हती. कारण तो पोलिसांच्या ताब्यात नव्हता.
न्यायालयात सुद्धा त्याला आपले म्हणणे मांडता आले असते किंवा आपल्या जवळची माहिती सांगता आली असती. पण तसे त्याच्याकडून काहीही झालेले नाही याचा अर्थ त्याच्याकडे काही सांगण्यासारखे होते असा होत नाही. पण तरीही त्याच्या एन्काऊंटरचे समर्थन करता येत नाही. पण त्याच्या एन्काऊंटर नंतर जे काही राजकारण सुरू झाले आहे त्याचेही समर्थन करता येणार नाही. अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरची नियमाप्रमाणे चौकशी होईल आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यावर शासन कारवाई करेल.
हेही वाचा:
कृती समितीची बैठक झाली पण रणशिंग फुंकलेच नाही!
‘मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी …’, मेगा लिलावाआधी मोठं विधान
अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ‘या’ पक्षाकडून बक्षीस जाहीर