उजनी बोट दुर्घटनेतील सर्व सहा मृतदेह सापडले

उजनी धरणाच्या जलाशयात मंगळवारी (दि. 21) प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये करमाळा तालुक्यातील कुगाव आणि झरे या गावातील बेपत्ता झालेल्या सर्व सहा प्रवाशांचे मृतदेह तब्बल 36 तासांनंतर नैसर्गिकरीत्या (natural)पाण्यावर तरंगत वर आले. एनडीआरएफच्या जवानांनी सर्व मृतदेह जलाशयातून बाहेर काढत पुढील कार्यवाहीसाठी करमाळा येथे पाठवले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळजाचा घाव घेणारा होता. दरम्यान, सर्व मृतदेहांवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोकुळ ऊर्फ कृष्णा दत्तात्रय जाधव (वय 30), त्यांची पत्नी कोमल गोकुळ जाधव (वय 25), मुलगा समर्थ गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), मुलगी वैभवी गोकुळ जाधव (वय 3) हे संपूर्ण कुटुंब तसेच गौरव धनंजय डोंगरे (वय 24) व बोट चालक अनुराग अवघडे (वय 26) अशी मृतांची नावे आहेत.(natural)
मंगळवारी (दि. 21) जाधव पती-पत्नी, दोन मुले, सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, आदिनाथ साखर कारखान्याचे चेअरमन यांचे पुत्र गौरव डोंगरे आणि बोटचालक अनुराग अवघडे असे सातजण उजनी जलाशयातून बोटीने कुगाववरून कळाशीकडे निघाले होते. बोट नदीपात्रातील ऐतिहासिक इनामदार वाडा परिसरात आली असताना अचानक वादळाचा तडाखा आणि पाऊस यामुळे बोट उलटली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहत कळाशीच्या दिशेने आले. इतर तीन पुरुष, एक महिला व दोन बालके असे सहाजण बेपत्ता झाले होते. त्यानंतर एनडीआरएफचे पथक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम राबविली होती. मात्र, काहीच हाती लागले नव्हते.

दरम्यान, आज सकाळी 36 तासांनंतर इनामदार वाडा परिसरातच बेपत्ता प्रवाशांपैकी दोन पुरुष, दोन महिला व दोन बालके यांचे मृतदेह पाण्यावर नैसर्गिकरीत्या तरंगत वर आले. त्यानंतर काही वेळातच कळाशीच्या बाजूला किनाऱयापासून काही अंतरावर बेपत्ता असलेला एकमेव मृतदेहही पाण्याच्या वर आला. सर्व मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी पाण्यातून बाहेर काढून किनारी असलेल्या सोलापूर जिह्यातील कुगाव येथे नेले. तेथून सोलापूर जिह्यातील करमाळा येथे पुढील प्रक्रियेसाठी पाठवले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन सुन्न करणार होता.

आई-वडील आणि दोन चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार
– उजनी धरणात बोट उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या सहाजणांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. त्यानंतर शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांवर कुगाव व चौघांवर झरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण करमाळा तालुका दुःखात बुडाला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. झरे येथील जाधव दाम्पत्य व त्यांची दोन लहान मुले या चौघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर कुगाव येथे बोटचालक अनुराग अवघडे याच्यावर, तर आदिनाथ साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव डोंगरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा :

गृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोंथिबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल…

यंत्रमाग उद्योगाला अतिरिक्त वीज सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांना महासंघाचे निवेदन

महाराष्ट्रात येऊ घातलेला आणखी एक मोठा उद्योग बाहेर…