ठाणे : एक साध्या ‘Excuse me’ या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. हा वाद डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात पाहायला मिळालं. गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पुनम गुप्ता या महिलेनं रस्त्यात उभे असलेल्या काही जणांना ‘Excuse me’ असं इंग्रजीत बोलल्याने ‘मराठीत(Marathi) बोला’ असं सांगून काही तरुणांनी वाद घातला.

इतकेच नव्हे तर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांच्या वेगवेगळ्या तक्रारी घेत अनिल पवार, बाबासाहेब ढबाले, रितेश ढबाले विरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली येथील गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पुनम गुप्ता या काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसोबत घराकडे येत होत्या. बिल्डिंगबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या काही जणांना बाजूला होण्यासाठी त्यांनी ‘Excuse me’ असं इंग्रजीत म्हणाल्या. त्यांनी ‘Excuse me’ म्हणताच तरुण संतापले.
रितेश बाबासाहेब ढबाले, त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढबाले आणि त्यांच्या काही साथीदारांनी ‘इंग्रजी नको, मराठीत(Marathi) बोला’ म्हणत पुनम आणि त्यांच्या मैत्रिणीला चापटा मारून बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर या गोंधळात पुनम यांचा नवरा आणि दुसरी मैत्रीण तेथे मदतीला आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तीन आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद घेत तपास सुरू केला आहे. या वादामुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद उफाळल्याचं पाहायला मिळत होतं. त्यातच आता इंग्रजी बोलण्यावरून देखील वाद निर्माण झाल्यानं हा वाद चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा :
तरुणी एकटी राहायची, एकेदिवशी Instagram वर मेसेज आला, आणि जीव जडला, पण नंतर जे घडलं त्याने…
क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकारणात! स्टार क्रिकेटरचा भाजपात प्रवेश
फडणवीसांचा मार्ग इतर मंत्र्यांना नकोसा?, महायुतीच्या मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी?