पुन्हा एकदा पाहता येणार आर्ची -परश्याची ‘सैराट’ लव्ह स्टोरी; ‘या’ दिवशी होणार Re-release

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटानं(movie) मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटानं केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावलं. या चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांचा नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता. अजय -अतुल यांच्या अप्रतिम संगीतानेही या चित्रपटाच्या लोकप्रियतेला हातभार लावला.

संपूर्ण जगात या चित्रपटातील(movie) गाणी प्रचंड गाजली. या यशानंतर ‘सैराट’ आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ‘सैराट’च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमाची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या(movie) पुनर्प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, ”आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं होतं. सैराटनं महाराष्ट्रातच नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळतेय. याहून आनंद काय असू शकतो? यासाठी मी झी स्टुडिओजला मनापासून धन्यवाद देतो. चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल, याची मला खात्री आहे.”

रिंकू राजगुरू म्हणते, “सैराट हा चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटानं मला फक्त ओळख नाही तर प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा दिली. ‘सैराट’ पुन्हा प्रदर्शित होतोय याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांची कायम आभारी असेन.”

आकाश ठोसर म्हणतो, “ ‘सैराट’ हा माझ्या करिअरचा पहिला आणि आजवरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. परश्या या व्यक्तिरेखेने मला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख दिली. सैराटच्या माध्यमातून आमच्या टीमने जे यश मिळवले, ते आजही आठवणीत आहे. सैराटचे पुनर्प्रदर्शन होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मला खात्री आहे, की प्रेक्षक पुन्हा एकदा या चित्रपटाला तितक्याच प्रेमाने स्वीकारतील.”

संगीतकार अजय अतुल म्हणतात, “ ‘सैराट’ हा चित्रपट खूप गाजला. त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सैराट चित्रपटाच्या कथानकामुळे आम्हाला गाणी करताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि त्यामुळेच ‘सैराट’ मधील सगळीच गाणी आजही सुपरहिट आहेत. तीच ऊर्जा घेऊन पुन्हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि आम्हाला खात्री आहे, जसं त्यावेळी प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम, प्रतिसाद दिला तसाच आताही मिळेल.”

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवेलकर म्हणतात, ” झी स्टुडिओज नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी दर्जेदार कलाकृती घेऊन येत असते. सैराट चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला एक अनोखी ओळख दिली आहे आणि तोच चित्रपट आता पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे. कथानक, कलाकार, संगीत, चित्रीकरण अशा सगळ्याच बाजू जमेच्या आहेत. आजही हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. मला खात्री आहे, ‘सैराट’च्या पुनर्प्रदर्शनातही प्रेक्षकांचा तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद असेल.”

हेही वाचा :

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आले आमनेसामने

कर्तबगार महिलांचा राज्यस्तरीय गौरव सोहळा संपन्न

अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अर्थसंकल्पात मोठी घोषणा!