यंदा राज्यात होणार तब्बल 6 दसरा मेळावे; कुणाचा कुठे आणि कधी होणार मेळावा?

महाराष्ट्रात दसरा(Dussehra) मेळाव्याला एक विशेष परंपरा आहे. दरवर्षी राज्यात दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी राज्यात 6 मेळावे पाहायला मिळणार आहेत. राज्यात कोल्हापूर येथे शाही दसरा मेळावा, नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा तर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू केला.

शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आता शिंदे गटाचा देखील दसरा(Dussehra) मेळावा होत असतो. तसेच,भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान गडावर दसरा मेळावा घेतला जातो. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी या मेळाव्याला सुरुवात केली होती. मात्र, यावर्षी आणखी एक मेळावा होणार आहे. यंदा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात प्रथमच मराठ्यांचा दसरा मेळावा होत आहे. म्हणजेच राज्यात यंदा वेगवेगळ्या ठिकाणी असे एकूण सहा दसरा मेळावे होणार आहेत. आता हे मेळावे नेमके कुठे आणि कधी पार पडणार, त्याबाबत जाणून घेऊयात.

कोल्हापूरचा शाही दसरा मेळावा : या सोहळ्याला पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाते. छत्रपती शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यासह शाहू महाराजांच्या कुटुंबियांकडून हा दसरा मेळावा घेतला जातो. यंदा दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता हा मेळावा होईल.

नागपूरचा आरएसएसचा मेळावा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सप्टेंबर 1925 मध्ये केशव बलिराम हेडगेवार यांनी दसऱ्याच्या दिवशी केली. त्यामुळे संघाच्या स्थापनेपासून येथे दसरा मेळावा आयोजित केला जातो. यावर्षी नागपूर येथे सकाळी 10 वाजता दसऱ्याच्या दिवशी येथे मेळावा होईल.

शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्क येथे यंदा दसरा मेळावा होईल. याबाबत जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा मेळावा सायंकाळी होईल.

शिंदे गटाचा मेळावा : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा यावर्षी मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून या मेळाव्याद्वारे भव्य शक्तीप्रदर्शन केलं जाईल. उद्या 12 ऑक्टोबररोजी सायंकाळी 7 वाजता हा मेळावा होईल.

पंकजा मुंडे दसरा मेळावा : यंदा प्रथमच मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे भगवान गडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. 12 वर्षांनी भाऊ-बहिणीची ही जोडी एकत्र येणार आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्व असणार आहे. दुपारी 1 ते 2 वाजता हा दसरा मेळावा होईल.

मनोज जरांगे दसरा मेळावा : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात प्रथमच मराठ्यांचा दसरा मेळावा होत आहे. यासाठी जय्यत तयार केली जात आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर हा दसरा मेळावा होत असून यासाठी जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा:

‘सिंघम अगेन’च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल, अर्जून कपूरवरही भडकले प्रेक्षक

देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारचा ‘घर घर संविधान’ उपक्रम

मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार महामंडळ स्थापन करण्याची घोषणा; पत्रकार संघटनेचा पाठपुरावा यशस्वी