राज्यातील अनेक भागात सध्या थंडीची लाट निर्माण झाली असून येणाऱ्या काही दिवसात थंडी(cold) आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. काही भागात तापमान एका आकड्यावरती आले आहे. तर, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठत आहेत. तर, काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी थंडीत किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा पुण्यात कडाक्याची थंडी पडली आहे. पुणे शहरातील एनडीए भागाचा पारा 6.5 अंशांपर्यंत खाली आला होता.
पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भात देखील थंडीची लाट उसळली आहे. या दोन दिवसात मराठवाड्यातील परभणीत 8.6, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8.8, विदर्भातील नागपुरात 7.0, गोंदिया 7.2, वर्धा 7.4 आणि अकोल्यात 9.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात पुढील तीन ते चार दिवसात थंडी(cold) आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. तर, सांगली- सोलापूर जिल्ह्यात सकाळच्या सत्रात वातावरण ढगाळ तर दुपारी ऊन जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात देखील थंडीचा कडाका आहे. आज कोल्हापूरमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहील. ढगाळ हवामानामुळे शेती पिकांना रोगांचा फटका बसू शकतो. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी योग्य ती फवारणी करावी, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
दरम्यान, देशातील वातावरण बद्दल बोलायचे झाल्यास जम्मू-काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंत थंडीची तीव्र लाट पसरली आहे. या सर्व भागांत कडाक्याच्या थंडीचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये थंडीचा पारा 0 ते 6 अंशांवरती गेला आहे.
हेही वाचा :
भुजबळांच्या नाराजीवर अजितदादा मोठा निर्णय घेणार?
मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली PM मोदींची भेट
हवेत उडणाऱ्या ड्रोनला मगरीने टाकले गिळून, पुढे जे झाले…Video