कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (political news)पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा सचिवांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. कल्याणातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष वरुण पाटील यांना वेळीच समज द्यावी अन्यथा महाराष्ट्रात त्याचे परिणाम दिसू शकतील अशा शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला इशारा दिला आहे.
आंबिवली येथे राहणारे कल्याण शहर भाजपचे(political news) सचिव विलास (मामा) रंदवे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विकासकामांच्या झंजावताने प्रेरित होऊन आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी विलास रंदवे यांनी दिली.
तर रंदवे यांच्यासह आंबिवली येथील उत्तर भारतीय समाज अध्यक्ष आशा शर्मा, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अनंत कुळेकर, मनसे पदाधिकारी राधा चौधरी, सदानंद जाधव यांच्यासह आंबिवली येथील विश्वकर्मा परिवाराच्या 70 सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना पक्षाचा भगवा ध्वज हाती घेतला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी जय श्रीराम आणि शिवसेना झिंदाबादची जोरदार घोषणाबाजीही केली.
तर भाजप जिल्हा सचिवांच्या या पक्ष प्रवेशाबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट इशारा दिला. भाजपच्या वरिष्ठ लोकांनी कल्याण पश्चिमेत अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष वरुण पाटील यांना वेळीच समज द्यावी. अन्यथा आमच्या अखत्यारीत येणाऱ्या कल्याण पूर्व, डोंबिवली आणि मुरबाड विधानसभेत आम्ही गप्प बसणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम केल्यास त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला दिसून येतील अशा शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी यावेळी भाजपला थेट इशारा दिला आहे.
तसेच या कार्यक्रमानंतर कल्याण पश्चिम शिवसेनेच्या विभाग संघटकांची मागासवर्गीय जिल्हा संघटक ह्या पदावर नियुक्ती झाल्याचे पत्रही जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले. या पक्ष प्रवेशावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, अरविंद पोटे, माजी नगरसेवक जयवंत भोईर, गोरख जाधव, दुर्योधन पाटील, महिला आघाडीच्या नेत्रा उगले, माजी नगरसेविका हर्षाली थविल यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा:
कोल्हापूरच्या शिवसेनेला पाचवीला पुजलेली दुफळी!
भारत सरकारचा एक निर्णय… अन् जगभरातील देशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस, अचानक धनलाभ होऊ शकतो