मुंबई: राज्यामध्ये लवकरच विधानसभा(politics) निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. नवरात्रीनंतर राज्याच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने या निवडणूकांना सामोरे जात आहे.
राज्यामध्ये बंडाचे राजकारण (politics)झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे राजकारण रंगले आहे. पक्षश्रेष्ठींचे राज्यामध्ये दौरे वाढले असून सभा आणि बैठकांचे सत्र वाढले आहे. दरम्यान, आज (दि.05) महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.
मागील आठ दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा महाराष्ट्र पूर्वनियोजित दौरा आहे. मागील आठवड्यांमध्ये ते पुण्यामध्ये मेट्रोच्या उद्घाटनासाठी येणार होते. मात्र पावसामुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला. आज (दि.05) पंतप्रधान मोदी हे पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार आहे. मोदींच्या हस्ते मुंबईत मेट्रो -3 चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. आणि इतर काही विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन केलं जाणार आहे.
त्यानंतर पंतप्रधान मोदी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरही जाणार आहेत. नवरात्रीनिमित्त पोहरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर पोहरादेवी या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते 23,300 कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या ‘बंजारा विरासत संग्रहालयाचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
त्याचबरोबर आता कॉंग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये असणार आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कसबा- बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्य़ात आली आहे. त्यानंतर राहुल गांधी हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
यावेळी राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर राहुल गांधी हे संविधान सन्मान कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांचा काल (दि.04) कोल्हापुरात पूर्वनियोजित दौरा होता. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा कालचा दौरा रद्द झाला. मात्र आज ते कोल्हापुरात येणार आहेत.
विधानसभा निवडणूकीच्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हा महाराष्ट्र दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे सुद्धा दोन वेळा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या निवडणूकीसाठी केंद्रामध्ये सुद्धा जोरदार तयारी आणि खलबतं सुरु असल्याचं स्पष्ट आहे. महायुती व महाविकास आघाडीचा आज प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे स्पष्ट आहे.
हेही वाचा:
आधी ५०% च्या आत मराठा आरक्षण द्या : मनोज जरांगे यांची राज्य सरकारला मागणी
काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; दोन गटात जोरदार राडा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पद व्हेंटिलेटरवर