राज्यातील यंत्रमागधारकांसाठी महावितरणकडून (Mahavitran)सवलती देण्याचा निर्णय घेतल्याने एकीकडे यंत्रमागधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे महावितरणच्या कृतीमुळे हा आनंद काळवंडला आहे. 27 HP खालील यंत्रमागधारकांना 1 रुपया प्रती युनिट आणि 27 HP वरील यंत्रमागधारकांना 75 पैसे प्रती युनिट सवलत देण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते.
या सवलतीचे परिणाम मार्च 2024 पासून लागू करण्यात आले आणि नुकतीच बिले ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. परंतु, महावितरणने(Mahavitran) या सवलतीचा प्रत्यक्ष लाभ यंत्रमागधारकांना न देता, तो पोकळ थकबाकीवरील व्याज आणि दंडामध्ये वळती करून घेतल्याचा गंभीर आरोप यंत्रमागधारकांनी केला आहे.
पोकळ थकबाकीचे प्रकरण
2020 साली, 27 HP वरील यंत्रमागधारकांना विजेची सवलत बंद करण्यात आली होती, कारण त्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नव्हती. या निर्णयाच्या विरोधात राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. परिणामी, दोन महिन्यांनंतर सवलत पुन्हा लागू करण्यात आली. मात्र, त्या दोन महिन्यांच्या थकबाकीचा विषय अद्याप अनिर्णित राहिला होता. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे ही पोकळ थकबाकी रद्द करण्यात आली होती, परंतु त्यावरील व्याज आणि दंड मात्र माफ झाले नव्हते. त्यामुळे यंत्रमागधारकांच्या बिलात ही थकबाकी सतत दिसून येत होती.
महावितरणकडून सवलतीचा लाभ हिरावला
महावितरणने या सवलतीचा लाभ यंत्रमागधारकांना न देता, तो पोकळ थकबाकीवरील व्याज आणि दंडात वळती केला आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांना प्रत्यक्ष सवलतीचा लाभ मिळाला नाही, असे आरोप इचलकरंजीतील यंत्रमागधारक जागृती संघटनेने केले आहेत. संघटनेने वेळोवेळी पोकळ थकबाकीवरील व्याज आणि दंड माफ करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु आजतागायत त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
आंदोलनाची तयारी
महावितरणकडून ही फसवणूक तात्काळ थांबवली जावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच, महावितरणने पोकळ थकबाकीवरील व्याज आणि दंडात वळती केलेली रक्कम रद्द करून नवीन बिले त्वरित वितरित करावी, अन्यथा महावितरणच्या विरोधात पुन्हा आंदोलन छेडावे लागेल, असे संघटनेने इशारा दिला आहे.
यंत्रमागधारकांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली सवलत एक महत्त्वाची योजना असली तरी, महावितरणच्या चुकीच्या धोरणांमुळे या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही. त्यामुळे यंत्रमागधारकांच्या संतापाची लाट उफाळून येत आहे, आणि ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर राज्यभर मोठे आंदोलन घडू शकते.
विनय महाजन
अध्यक्ष
यंत्रमागधारक जागृती संघटना
हेही वाचा:
महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यास केंद्रातील मोदी सरकारही पडणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे विधान
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर…
टाटा ग्रुपची ‘ही’ कंपनी देणार तगडे रिटर्न्स, शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक केल्यास होणार भरपूर फायदा!