फसवणूक! काल, आणि आज!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी (पूर्वार्ध) : या समाजात जोपर्यंत फसणारे आहेत, तोपर्यंत फसवणारे असणार आहेत. फसवणूक(Cheating) कालही केली जात होती आणि आजही केली जात आहे. फक्त फसवणुकीचे तंत्र बदलले आहे. पूर्वी फसवणारा आणि फसणारे समोरासमोर होते आणि आज दोघेही परस्परांपासून खूप अंतरावर असूनही फसवणूक होते आहे. दोघेही डिजिटल च्या माध्यमातून जवळ असूनही खूप दूर असतात.

दोघांनीही एकमेकांना पाहिलेले नसते. आता तर”डिजिटल अरेस्ट”हा नवाच गुन्हे प्रकार आला आहे. आणि त्यात संबंधिताला अंतरबाह्य घाबरवून लुटले जाते. 2024 मध्ये देशभरात अशा प्रकारचे गुन्हे प्रचंड प्रमाणावर झाले आहेत. डिजिटल तंत्राचा विविध प्रकारे वापर करून देशात या वर्षात सुमारे एक कोटी गुन्हे घडले आहेत आणि त्याची नोंद पोलीस ठाण्यात झालेली आहे. लोकनिंदेला घाबरून पोलीस ठाण्यापर्यंत न आलेल्या तक्रारींची संख्याही मोठी आहे.

फार पूर्वी बघता बघता गंडा घालून जाणारे ठग, ठकसेन होते. आपण फसलो आहोत हे तो ठकसेन निघून गेल्यानंतर समजायचे. भामटेगिरी हा गुन्हे प्रकारही त्यातलाच. भामट्यांकडून फारसे आर्थिक नुकसान होत नसेल मात्र फसलेला माणूस हा झालेले नुकसान अक्कल खाती जमा करायचा.

कोल्हापूर शहरात घडलेला असाच एक प्रकार. ज्यांचा व्यवसाय सोन्याचे आणि चांदीचे दागिने घडवण्याचा, तसेच त्याला पॉलिश करून देण्याचा. अशा एका सराफी व्यापाऱ्याच्या घरातील महिलेने, दारावर सोन्याचे दागिने पॉलिश करून देणाऱ्या बिहारी भामट्याला घरातील सर्व दागिने पॉलिश करण्यासाठी दिले. दागिने अगदी चकाचक झाले पण वजनात 50 टक्क्यांची तूट आली होती. त्या महिलेच्या दागिन्यातील 50% सोन्याचा अंश त्या भामट्याने त्याच्याकडे असलेल्या सल्फरिक ऍसिड मध्ये वितळवून घेतलेला होता.

सुमारे 60 वर्षांपूर्वी राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला”श्री 420″हा चित्रपट तिकीट बॉक्सवर धुमाकूळ घालून गेला होता. लोकांना लाखो रुपयांचा चुना कसा लावायचा, आणि त्यासाठी कोणते आमिष दाखवायचे याचे अतिशय भेदक चित्रण या चित्रपटात होते. त्या काळात लोकांची कशी फसवणूक(Cheating) व्हायची याचे वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून समाजासमोर आणले गेले होते.

मोबाईल क्रांती झाली नव्हती, डिजिटल तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते तेव्हा गुप्तधन काढून देतो, पैशाचा पाऊस पाडतो, नागमणी देतो, पैसे दुप्पट करतो असे सांगून लोकांची लूट करण्याचा गुन्ह्याचा नवीन प्रकार आला होता(Cheating). विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात अशा प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घडले होते. करोडो रुपयांची लूट त्यातून करण्यात आली होती तर काहीजणांचे मुडदे गुन्हेगारांनी पाडले होते.

आजही हे प्रकार पूर्णपणे थांबले आहेत तर असे म्हणता येणार नाही. प्रिंटिंग उद्योगात नवीन तंत्रज्ञान आले. छपाई रंगीत झाली. झेरॉक्स मशीन हा प्रकार आला. रंगीत प्रतिमा देणारे स्कॅनर आले. आणि मग त्यातून बनावट नोटा छापून बाजारात आणण्याचा एक नवा उद्योग गुन्हेगारांच्या कडून सुरू झाला. आजही असे उद्योग चालू आहेत. त्याच्याही आधी चेक फोर्जरी असा गुन्हे प्रकार सुरू झाला होता पण तो मुंबई पुरता मर्यादित होता.

पोस्टमन ना आमिष दाखवून त्यांच्याकडे धनादेश असलेले लिफाफे काढून घ्यायचे(Cheating). हेराफेरी करून धनादेश मधील रक्कम वाढवायची आणि हे धनादेश वटवायचे अशा प्रकारचे गुन्हे माणेकलाल नावाचा गुन्हेगार करायचा. अरविंद पटवर्धन या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने या माणेकलाल वर एक पुस्तकच लिहिले होते. मुंबईकरांना कित्येक कोटी रुपयांचा चुना त्याने लावला होता.

कोणतीही जीवनावश्यक वस्तू अर्ध्या किमतीत, उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, फ्रिज, इतकेच नव्हे तर टू व्हीलर, अर्ध्या किमतीत देऊ अशी आमिषे दाखवून शेकडो लोकांना फसवून रातोरात पळ काढणाऱ्या व्यापारी कंपन्यांचे महाराष्ट्रात अक्षरशः पेव फुटले होते. वस्तूची जी छापील किंमत असते तिच्यापेक्षा जास्त किंमत लावली तर तो ग्राहक संरक्षण कायद्याखाली गुन्हा आहे पण छापील किमतीपेक्षा कमी किमतीत वस्तू विकणे हा गुन्हा ठरू शकत नाही म्हणून अशा प्रकारचे गुन्हे तेव्हा फार क्वचित दाखल केले गेले जात असत.

स्वस्तिक फायनान्स, लक्ष्मी फायनान्स अशा प्रकारच्या पाट्या लावून काही गुन्हेगारांनी कोल्हापुरातील हजारो लोकांना काही वर्षांपूर्वी लुटले होते. सहा महिन्यात रक्कम दाम दुप्पट हा अर्थशास्त्रात कोठेही न बसणारा अर्थव्यवहार अनेकांनी सुरू केला आणि करोडो रुपये लुटून एका रात्रीत कंपनीला टाळे लावून पलायन केले.

डिजिटल क्रांतीच्या कितीतरी आधी बँकिंग क्षेत्रात संगणक प्रणाली आली. बँकेत नोकरी करणाऱ्या काही जणांनी या संगणक प्रणालीचा गैरफायदा घेऊन दुसऱ्याच्या खात्यावरील रक्कम, तिसऱ्याच्या बँक खात्यावर जमा केली. अर्थात ज्या खात्यावर हे पैसे जमा व्हायचे ते खाते हे गुन्हे प्रवृत्तीचे कर्मचारीच ऑपरेट करायचे. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात” पेजर” आला. त्याच्या पाठोपाठ मोबाईल आला. साध्या मोबाईलचे रूपांतर 21 व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात स्मार्टफोन मध्ये झाले आणि त्याचा वापर लोकांना गंडा घालण्यासाठी, करोडो रुपयांचा चुना लावण्यासाठी केला जाऊ लागला.

हेही वाचा :

Rohit Sharma ची कसोटीतून निवृत्ती? सिलेक्टर अजित आगरकरांची कर्णधारासोबत चर्चा

तुपासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, फायदे होण्याऐवजी शरीराचे होईल गंभीर नुकसान

स्कूटर चालवत असताना अचानक बेशुद्ध पडला व्यक्ती, हेल्मेट काढताच बाहेर निघाला भयावह जीव; Video