कल्याणमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. या प्रकरणानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेंशी फोनवरुन संवाद साधत काही निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या घटनेवर भाष्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कल्याणमधील चक्की नाका येथे घडलेल्या घटनेवरुन सरकारवरुन टीका होत असल्याचं विचारलं. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद तसंच माणुसकीला काळीमा फासणारी आहे. कालच श्रीकांत शिंदे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन दिलासा दिला आहे. आमच्या कुटुंबातील घटना आहे असं समजून सरकारने ती गांभीर्याने घेतली आहे. यामध्ये जो दोषी आहे त्याला कठोर शासन झालं पाहिजे, फास्ट ट्रॅकवर प्रकरण घेऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार गांभीर्याने पाहत आहे.
“कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे, मात्र कोणत्याही दुर्घटनेचं राजकारण केलं जाऊ नये. घटना दुर्देवी आहेच, पण त्याचं राजकारण करणं जास्त दुर्दैवी आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष, अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे. अशा नराधमांना जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यांचा बंदोबस्त केला जाईल,” असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्त डुंबरे यांच्याशी चर्चा करताना कल्याणमध्ये घडलेली घटना फारच गंभीर असल्याचं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे”, असंही म्हटलं आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याबद्दल गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त करताना पुढील खटला हा जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. “हा खटला जलदगती न्यायालयात चालवा,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती मिळाली आहे. “आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा,” असे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन आरोपी विशाल गवळी तिला घरी घेऊन गेला. तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला. यासंदर्भातील वाच्यता तिने कुठेही करु नये म्हणून त्याने मुलीची हत्या केली. त्यानंतर घरातील एका बॅगेत मृतदेह भरुन ठेवला. सायंकाळी पत्नी घरी आली तेव्हा त्याने पत्नीला सर्व घटनाक्रम सांगितला. पती आताच तुरुंगाबाहेर तो पुन्हा तुरुंगात जाऊ नये म्हणून पत्नी साक्षीनेच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रातून सुरु होणार भारतातील दुसरा सर्वात मोठा महामार्ग: चेन्नई एक्सप्रेसपेक्षा जलद प्रवास
गोव्यात रोमँटिक ट्रिपचे धाडस: युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाच्या जिवावर आली वेळ
कुटुंबातील कट: मामा-मामी आणि भाडेकरूंच्या सहभागाने सतीश वाघ यांची हत्या