ईदच्या नमाजावरून वाद! रस्त्यावर नमाज पढल्यास पासपोर्ट रद्द होणार

उत्तर प्रदेशमधील मीरत पोलिसांनी ईदच्या (Eid) पार्श्वभूमीवर एक कठोर इशारा दिला आहे, ज्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. रस्त्यावर नमाज पढल्यास संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट व वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो, असा इशारा देत पोलिसांनी सक्त सूचना जारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिंह चौधरी यांनी या कारवाईची तुलना थेट ‘थॉट पोलिसां’शी केली आहे.

दरवर्षी ईदच्या (Eid) दिवशी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर नमाज अदा केली जाते. मात्र, यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो, असा पोलिसांचा दावा आहे. यंदा ३१ मार्च रोजी ईद साजरी होण्याची शक्यता आहे आणि त्याआधीच मीरत पोलिसांनी आठ जणांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. या आठ जणांनी गेल्या वर्षी रस्त्यावर नमाज अदा करत प्रशासनाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

मीरतचे पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंह यांनी स्पष्ट केलं आहे की, “रस्त्यावर नमाज अदा करण्यास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. यासाठी आम्ही आधीच मुस्लिम बांधवांना सूचित केलं आहे की त्यांनी जवळच्या मशिदी किंवा इदगाहमध्येच नमाज अदा करावी.”

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फौजदारी गुन्ह्यांची नोंद, पासपोर्ट व वाहन परवाना रद्द, अशा कठोर कारवाईच्या इशाऱ्याचाही समावेश केलेला आहे. या कारवाईचा परिणाम केवळ मीरतपुरता मर्यादित नाही. संभल, अलीगढ, हथरस आणि गाझियाबादमध्येही अशाच सूचना दिल्या गेल्या आहेत.

केंद्रीय मंत्री जयंत सिंह चौधरी यांनी मीरत पोलिसांच्या या आदेशावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जॉर्ज ऑरवेल यांच्या प्रसिद्ध ‘1984’ कादंबरीतील “थॉट पोलिस” या संकल्पनेचा उल्लेख करत, प्रशासनावर सूचक टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या आदेशांवर अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

या वादानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एकीकडे पोलीस कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा मांडत आहेत, तर दुसरीकडे धार्मिक स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा समोर येत आहे.

हेही वाचा :

‘या’ 3 राशींचा 29 मार्चपासून सुवर्णकाळ होणार सुरु, जगतील राजासारखं जीवन

दोन दिवसांपासून बेपत्ता, सगळीकडे शोध-शोध शोधलं; शेवटी घरातच बॅगमध्ये आढळला चिमुकलीचा मृतदेह

31 मार्च डेडलाईन! ‘या’ 5 गोष्टींसाठी शेवटची संधी, चुकल्यास मोठे नुकसान!